Friday, 5 May 2017

मंगल विवाह एक दैवी अनुभव


 
अमरावतीचे ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांची मूकबधीर मानसकन्या मंगल आणि रावेर येथील देविदास जैन यांचे मूकबधिर चिरंजीव योगेश यांचा मंगल विवाह सोहळा जळगाव येथे दि. ३० एप्रिल २०१७ ला अत्यंत उत्साहात पार पडला. या राष्ट्रीय मंगल विवाह सोहळ्याचे आयोजक रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट होते. हा अनोखा विवाह सोहळा जळगावच्या संपूर्ण रोटरी परिवाराने आपल्या घरचे कार्य म्हणून उत्साहाने साजरा केला. या विवाह सोहळ्याचा प्रकल्प प्रमुख म्हणून गेले महिनाभर मी काम करीत होतो. माझी भूमिका एक प्रकारे शंकरबाबा यांची १९ वी कन्या चि. सौ. कां. मंगला हिच्या पालकाचीच होती. त्यामुळे प्रत्येक काम व जबाबदारी वधुचा पिता म्हणूनच मी पार पाडली. हा विवाह सोहळा झाल्यानंतर मला एक दैवी अनुभव प्राप्त झाल्यासारखे वाटते आहे.


शंकरबाबा यांचे स्व. अंबादास पंत वैद्य दिव्यांग बालगृह (वझ्झर, ता. अचलपूर, अमरावती) तेथे आहे. मूक, बधीर, गतिमंद अशा स्वरुपात जन्माला आलेली मुले समाजात बेवारस म्हणून सोडून दिली जातात. अशा मुलांचा सांभाळ वझ्झर येथील आश्रमात शंकरबाबा करतात. त्यातील जी मुले, मुली लग्नाच्या वयात येतात त्यांचा विवाह शंकरबाबा लावून देतात. अशा प्रकारे त्यांनी यापूर्वी १८ मुलींचे लग्न लावले आहे. चि. सौ. कां. मंगला ही त्यांची १९ वी कन्या आहे. तिचा विवाह चि. योगेश यांच्याशी जळगावात झाला.

हा विवाह सोहळा संपूर्ण समाजाच्या साक्षीने व्हावा अशी शंकरबाबा यांची अपेक्षा होती. साधारणपणे चार महिन्यांपूर्वी नागपूर येथे रोटरी प्रांत ३०३० च्या राज्यस्तर सेमिनारसाठी जळगावहून रोटरीचे अनेक पदाधिकारी गेले होते. त्यात मी सुद्धा रोटरी ३०३० चा उपप्रांतपाल म्हणून सहभागी झालो होतो. त्या सेमिनारमध्ये रोटोस्पोर्टचे जळगाव येथे उत्तमपणे आयोजन झाल्याबद्दल जळगाव रोटरी क्लब वेसट चा सत्कार झाला. तेव्हा शंकरबाबा मान्यवर वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांचे भाषण सुरू असताना त्यांनी जळगाव रोटरीचा गौरवपूर्ण उल्लेख करुन मानस कन्या दिव्यांग मंगलचा विवाह जळगाव येथे सामुहिक सहकार्यातून करण्याची विनंती केली. त्यानंतर रोटरी ३०३० चे माजी प्रांतपाल अमरावतीचे किशोरजी केडियांनी व्यक्तिशः माझ्या नावाचा उल्लेख करीत लग्न सोहळा आयोजनाची जबाबदारी सोपविली. मी सुद्धा रोटरी परिवाराच्या पाठबळावर जबाबदारी स्वीकारायला तयार झालो. नागपुरातून ही जबाबदारी घेवून जळगावात आल्यानंतर जवळपास दोन महिने तयारीत गेले.

शंकरबाबा यांच्याशी असलेल्या मैत्रिपूर्ण संबंधातून या विवाह सोहळ्यासाठी राज्याचे मंत्री बडोले, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्यासह मंत्रालय व जिल्हा प्रशासनातील अनेक वरिष्ठ अधिकारी जळगावात आले. स्थानिक लोकप्रिनिधींनीही उत्साहाने सहभाग घेतला. रोटरी क्लब परिवाराचे सर्वच पदाधिकारी घरातील कार्य समजून कार्य करीत होते. यात जळगाव वेस्टचे अध्यक्ष योगेश भोळे, अनिल कांकरीया, रमण जाजू , नितीन रेदासनी, सुनील सुखवानी, पंकज राऊत व विवेक काबरा यांचा खास उल्लेख करावा लागेल. इतर सदस्यांनीही लग्न सोहळ्यातील अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या. माल्टिमिडीया फिचर्स प्रायव्हेट लिनीटेडचे सुशीलभाऊ नवाल यांची मोलाची मदत मिळाली.

ा विवाह सोहळा रोटरीने का घेतला याविषयी दोन प्रश्न विचारले जातात. पहिला म्हणजे, रोटरी ही सामाजिक संस्था असताना अशा प्रकारचे लग्न लावायचे काम रोटरीने करायला हवे का आणि दुसरा अशा भव्य दिव्य लग्न कार्यक्रमात एकाच्या ऐवजी सामुहिक विवाह सोहळा का घेतला नाही ?

हे दोन्ही प्रश्न रास्त आहेत. त्याची उत्तरेही प्रकल्प प्रमुख म्हणून मी द्यायला हवीत. पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात मी म्हणेन की, रोटरीने घेतलेला हा मंगल विवाह सोहळा राष्ट्रीय सोहळा आहे असे मी अगोदरपासून म्हणतोय. त्याचे कारण हेच की समाजातील अपंग, बधीर, दिव्यांग अथवा गतीमंद मुलांची वयाची १८ वर्षे पूर्ण झाली तर त्यांचा सांभाळ सरकारी वसतीगृहे अथवा अनाथालयात करता येत नाही. हा मुद्दा शंकरबाबा गेली ५० वर्षे मांडत आहेत. मंगलच्या विवाह सोहळ्यातून सरकारसमोर हाच विषय मांडण्यासाठी मंगल विवाह सोहळा हा राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून घेण्याचे निश्चित केले. मला व्यक्तिशः हा विषय आवडला व तो मी इतर रोटरी सदस्यांना समजावून दिला.

विवाह सोहळ्यास राज्यमंत्री व केंद्रीयमंत्री दोघेही आले. त्यांनी आश्वासन दिले आहे की, १८ वर्षांवरील दिव्यांगाचा सांभाळ करण्यासाठी कायदा होणे आवश्यक असून यासाठी राज्य शासन केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करणार आहे. मला असे वाटते की अशा प्रकारचा कायदा जेव्हा तयार होईल तेव्हा मंगल विवाह सोहळा आणि जळगाव रोटरी वेस्ट क्लबचे नाव इतिहासाच्या पानांत लिहीले जाईल.

 दुसऱ्या प्रश्नाचेही समर्पक उत्तर माझ्याकडे आहे. ते म्हणजे, केवळ मंगल हिचा एकटीचा विवाह सोहळा का केला, सामुहिक विवाह सोहळा का नाही केला ? याचे कारण हेच की दिव्यांग मंगल व योगेशच्या विवाह सोहळ्याला सर्वच प्रकारच्या माध्यमांनी सुरुवातीपासून जोरदार प्रसिद्धी दिली. समाजाच्या समोर हा प्रश्न तेवढ्याच प्रभावीपणे मांडण्यासाठी प्रसिद्धीही तशीच हवी होती. जर आम्ही सामुहिक विवाह सोहळा केला असता तर त्यात इतरांनाही सहभागी करावे लागले असते. त्यामुळे दिव्यांग वर-वधू सोहळा हा विषय बाजुला पडला असता.

या विवाह सोहळ्याने मला एक दैवी कार्यक्रम संयोजनाचा अनुभव दिला. रोटरीने उत्कृष्ट टीमवर्क करीत एक सामाजिक प्रश्न समाजासमोर मांडला. समाजातील बेवारस मतीमंद, दिव्यांग आणि प्रज्ञाचक्षू मुले मुली अल्पवयीन असताना त्यांचा सांभाळ बालसुधारगृह अथवा संस्थांमध्ये सांभाळ केला जातो. मात्र, ती १८ वर्षांची झाली तर त्यांचा कायद्यानुसार सांभाळ करता येत नाही. वयाने मोठी झालेली ही मुले नंतर समाजात कुठे लुप्त होतात याचा पत्ता लागत नाही. ते वाईट मार्गाला लागतात अथवा त्यांचे हाल होतात. अशा मुलांना सुरक्षित जगण्याचा अधिकार देण्याकडे जळगावच्या राष्ट्रीय मंगल सोहळ्याने एक पाऊल पुढे टाकले आहे. अशा मुलांच्या पोषण व निवासासाठी सरकार काही तरी सकारात्मक योजना नक्की करेल असा विश्वास आहे.


शेवटी जळगाव शहरातील विविध मीडियाने या कार्यक्रमाला सुरुवातीपासुन भरभरून प्रसिद्धी दिली. त्याबद्दल त्यांचे आभार मानायला हवेत. माध्यमे सुद्धा समाजातील अनाथ, दिव्यांग यांच्या प्रश्नाबाबत जागरुक व संवेदनशील असल्याचे दाखवून दिले. त्यांचे पुनश्च विशेष अभिनंदन !

No comments:

Post a Comment