Sunday, 13 March 2016

... आणि वडील म्हणाले ॲप्रुव्हड !!!

रामराम मंडळी.

डॉ. सौ. सीमा आणि डॉ. राजेश
आजपासून आपण आठड्यातून एकदा नक्की भेटू. जगाच्या या कट्ट्यावर मीपण गप्पा मारायला येतोय. माझ्या जडण-घडणीचा प्रवास मी आनंदयात्रा या सदरातून सांगणार आहे. माझ्या गप्पा म्हणजे आत्मकथा नाही. कधी स्वतःविषयी, कधी कुटुंबाविषयी तर कधी समाजाविषयी, आमच्या आरोग्य आणि वैद्यकिय सेवा या विषयी आपणाशी बोलणार आहे. कारण गावाकडील आमच्या मोठ्या पाटील कुटुंबातील मी पहिला डॉक्टर.
गप्पांना प्रारंभ कोठून करावा ? प्रश्न आहे. माझे वडील निवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी विश्वासराव भास्करराव पाटील यांच्याविषयी आज बोलू या. माझ्या आनंदयात्रेत त्यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. त्यांच्या अपेक्षा आणि प्रेरणेच्या पाठबळावर मी डॉक्टर झालो. आज यशस्वीपणे मी उभा आहे.

आमचे मूळगाव चाळीसगाव तालुक्यातील उपखेड. अगदी छोटेगाव. वडील महसूल अधिकारी असल्याने कडक शिस्तीचे होते. आई प्रतिभा घरकामात धन्यता मानणारी. अगदी साधी गृहिणी. तिचे माहेर एरंडोल तालुक्यातील आडगावचे.

मी जळगावच्या ला. ना. शाळेत काही वर्षे शिकत होतो. बाकी बहुतांश शालेय शिक्षण व अकरावी, बारावी धुळ्यात जयहिंद महाविद्यालयात झाले. मी अभ्यासात तसा हुशार होतो. त्यामुळे वडिलांची ईच्छा मी डॉक्टर व्हावे हिच होती. त्याकाळी मराठा समाजातून डॉक्टर होणाऱ्यांची संख्या कमी होती. डॉक्टर होणे म्हणजे संपूर्ण कुटुंबाला प्रतिष्ठा मिळत असे. मी डॉक्टर होणार याच अपेक्षेने त्यांनी जळगाव येथे राष्ट्रीय महामार्गावर हॉस्पिटलसाठी जागाही घेवून ठेवली होती.

बारावीत अनपेक्षितपणे कमी गुण मिळाल्यामुळे मला बी. जे. मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकला नाही. त्यामुळे अमरावती, कराड किंवा प्रवरानगरला प्रवेशाचे प्रयत्न सुरू झाले. अखेर प्रवरानगरजवळील लोणी येथील ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला आणि जीवनाला पूर्ण कलाटणी मिळाली. खरेतर या काॅलेजातच मी घडत गेलो. कॉलेजमधील माझ्या मित्रांचा गृप अॉलराऊंडर होता. गाणे, संगित, नाटके, स्पोर्ट अशा सर्वच प्रकारात मी पुढे होतो. सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून निवडूनही आलो होतो. कॉलेजात जे जे मुले करतात ते मी मित्रांसोबत केले. गंमत सांगतो, आम्ही कट्ट्यावर बसून अनेक पैजा लावायचो. खट्याळ गँग म्हणून आम्ही फेमस होतो. आमच्या २५ मित्रांच्या ग्रुपचे नाव झिरो बाॅईज म्हणून आजही काॅलेजातल्या सगळ्यांच्या स्मरणात आहे.

सिमाची व माझी भेट काॅलेजातच झाली. ती मला २ बॅच ज्युनियर होती. आम्ही दोघे एका नाटकात सोबत होतो. मी हिरो आणि हिरॉईन दुसरीच होती. गॅदरींगच्या धामधूमीत मला ॲनोनिमस (ओळख नसलेले) कार्ड आले. ते बहुधा सिमाने पाठवले असावे असे समजून मी तिला विचारले. तिने स्पष्ट नकार दिला. तशी ती आधीपासून स्पष्ट बोलते. पण, गैरसमजातून का होईना आमची मैत्री तेथून सुरू झाली. आयुष्यातला सगळ्यात सुखद योग जुळून आला. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. या प्रकरणाची घरी माहिती नव्हती. तसा दोघांचाही समाज मराठा असल्याने अडचण नव्हती. मात्र माझ्या लग्नाविषयी वडिलांचे काही ठोकताळे होते म्हणून काही काळ प्रतिक्षा करणे भाग होते.

आम्ही दोघांनी प्रवरानगरला एमबीबीएस पूर्ण केले. नंतर दोघेही एमडीसाठी कर्नाटकातील गुलबर्गा येथील मेडीकल कॉलेजला गेलो. मी बालरोग विषय घेतला. सिमाने स्रीरोग व प्रसुती विषय घेतला. याआधीच लग्नाचा निश्चय झाला होता. एमबीबीएस पूर्ण झाल्यानंतर आमच्या दोघांच्या लग्न या विषयाला गती मिळाली.

सिमाचे माहेर परभणीचे. तेथील पांगारकर कुटुंब म्हणजे तालेवार घराणे. आमच्या तुलनेत खुपच पुढे. त्यांचे हिरोहोंडा, महिंद्रा,  एल ॲण्ड टी आदी विक्रीचे मोठे शोरूम्स होते. एकत्रित सोळाशे एकर शेती. पांगारकर कुटुंबाची आमच्या लग्नाला पसंती होती. पण, माझ्या वडीलांना पांगारकरांची माहिती काढायची ईच्छा झाली. दोन जवळच्या नातेवाईकांसोबत ते परभणीला गेले. पांगारकरांच्या शोरुम समोर लॉजमध्ये मुक्कामी थांबले. सोबतच्यांना पांगारकरांच्या आजुबाजूला पाठवून त्यांनी माहिती काढली. मी वडीलांच्या होकारकडे लक्ष देवून होतो. चौथ्यादिवशी ते जळगावला परतले आणि मला म्हणाले सुनबाई म्हणून सिमा ॲप्रुव्हड...! त्यानंतर मोठ्या थाटामाटात परभणीत लग्न झाले. जळगावात व नाशिकचा असे २ भव्य स्वागत समारंभ झाले.

दोघे एमडी करीत असताना कन्यारत्न प्रियंका झाले. मी नाशिकला व सिमाने मुंबईत अनुभवासाठी काम केले. त्यांनतर मी जळगावच्या जिल्हा रुग्णालयात १ वर्ष बालरोग तज्ञ होतो. नवजात शिशू अतिदक्षता विभागाची स्थापना करून ते पूर्ण क्षमतेने चालवायला प्रयत्न केले. रोटरीच्या जळगाव वेस्टचा अध्यक्ष असताना जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांसाठी जीवरक्षक यंत्रणा देण्यासाठी उपक्रम मी राबवला. यंत्रणा तर दिली मात्र, ती आजही वापरात नाही ही खंत आहे. काही काळ स्वातंत्र्य चौकाजवळ डॉ. दिलीप चव्हाण यांच्या हॉस्पिटलमधील तळघरात मी माझी बालरोग वैद्यकीय सेवा सुरु केली होती.

या दरम्यान, जमापुंजीतून वडीलांनी घेतलेल्या जागेवर हॉस्पिटलचे काम सुरू केले. जागा हायवेवर व मोक्याची होती. जागेवर काही झोपड्या होत्या. वडीलांनी मित्रांना सोबत घेवून जागेवर ठाण मांडले. सेवानिवृत्त अप्पर जिल्हाधिकारी असल्याने सर्व प्रकारचे अस्र वापरून त्यांनी अतिक्रमण करणाऱ्यांना तेथून हटविले. नंतर बांधकाम सुरू असताना त्यांचेच तेथे लक्ष असे.

मी जळगाव पीपल्स बँकेकडून १८ टक्के व्याजाने हॉस्पिटलसाठी कर्ज घेतले. आमचे काम सुरु झाल्यानंतर कर्ज देणाऱ्या इतर बँका येत गेल्या. व्याजदर कमी होत गेले. आमचे उलटे झाले. जसे जसे पेशंटस वाढत गेले तसा तसा कर्जाचा हप्ता कमी झाला. मी महिन्याला सव्वालाखांचा व्याजासह कर्जाचा हप्ता भरत असे. नंतर कर्मचारी वेतन, लाईट बील जावून मग आमच्यासाठी कमाई करावी लागे. तो सारा जुगाड तेव्हा तणावाचाच होता. हॉस्पिटल पूर्ण झाल्यावर वडील तेथेच बसत. ओळखीपाळखीच्या रुग्णांचे बील कमी करायला सांगत. त्यांना आमच्या दरमहा खर्चाचे गणित माहित असूनही. आम्ही त्यांचा शब्द टाळत नसू. कारण, मी डॉक्टर होणे ही त्यांचीच ईच्छा व पुण्याई होती.

येथे एक गोष्ट मुद्दाम सांगतो. माझे वडील महसूल खात्यात अप्पर जिल्हाधिकारी होते पण ते करारी बाण्याचे होते. वडीलांनी वेतन व आयुष्यची पुंजी जागेत लावली म्हणून मी तेथे  कर्जावर हाॅस्पिटल बांधले. माझ्या वडीलांनी चारचाकी वाहन घेतले ते वयाच्या ५५ व्या वर्षी. माझ्यावर आई व वडीलांचा खुप प्रभाव राहीला. म्हणूनच वडीलांच्या विश्वासराव नावातून "विश्व" आणि आईच्या प्रतिभा नावातून "प्रभा" घेवून "विश्वप्रभा " हे समर्पक व हॉस्पिटलला सार्थक करणारे नाव दिले. त्यांच्या पुण्याईवर आनंदयात्रा सुरू आहे. इतरही आठवणी पुढील गप्पांमधून सांगेन. आज तूर्त अर्धविराम !!!घणणणणा ममममम

4 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. Well written, the trial and tribulations of a doctor and a wonderful ongoing journey. Best wishes and a wonderful future ahead. Cheers ��������

    ReplyDelete
  3. डॉक्टर खूप छान लिहिले आहे।। तुम्ही कसे घडले यातून तुमच्या जीवनाची वाटचाल खूप प्रेरणादायक आहे।।पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा।।

    ReplyDelete
  4. डॉक्टर खूप छान लिहिले आहे।। तुम्ही कसे घडले यातून तुमच्या जीवनाची वाटचाल खूप प्रेरणादायक आहे।।पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा।।

    ReplyDelete