Saturday, 19 March 2016

पेशंटच्या तोंडूनच प्रचार ... प्रसार !

डॉक्टरांच्या मेडिबीट्स अॉर्केस्ट्रात गाताना डॉ. राजेश पाटील
विश्वप्रभा हॉस्पिटल हे महिला आणि शिशुंच्या सेवेत  दि. ३ डिसेंबर १९९९ पासून रुजू झाले. त्या काळात जळगाव शहरात बालरोगतज्ञ डॉक्टरांची संख्या जवळपास बारा होती. मी तेरावा होतो. बालरोगतज्ञांचे आपापसात तसे संघटन नव्हते. फारसे एकत्र येणेही नव्हते. सेवा किंवा व्यवसायाच्या स्पर्धेतून परिचय आणि सख्यही नव्हते. बालरोग क्षेत्रातच मलाही काम करायचे असल्याने मी इतर ज्येष्ठ आणि जुन्या बालरोगतज्ञांच्या भेटी गाठीला जावू लागलो. ते पेशंट तपासत असत मी मात्र गप्पा मारत असे. आपापसातील नेहमी सकारात्मक गोष्टीच मी परस्परांना सांगत असे. यातूनच बालरोगतज्ञांची संघटना सुरु करायच्या सहमतीवर एकमत झाले. इंडियन अॅकेडेमी अॉफ पेडीयाट्रीकची (IAP) जळगाव शाखा स्थापन करण्याचे ठरले. या संघटनचा पहिला हेतू केवळ महिन्यातून एकदा एकत्र येवून भेटणे व सोबत जेवणे एवढाच होता. अशा रितीने संघटन उभे राहीले.

ज्येष्ठ डॉक्टर सिकची, अनंत पाटील, विशवेश अग्रवाल, प्रभाकर पाटील, आठवले मॅडम, प्रदीप पाटील, राजेंद्र पाटील, राजेश शिंपी, सरोज भालोदे, उभाडपाटील, गिरीश बोरसे, मनिषा कोल्हे असे बारा आणि मी मिळून तेरा जणांची संघटना अस्तित्वात आली. सिकचीसर संस्थापक अध्यक्ष आणि मी सचिव झालो. आजही आमचे हे संघटन कायम असून विविध विषयांवर आम्ही आता एक्टीव्ह आहोत. विविध बालरोग, नवनवीन आजार व उपचार पध्दत आदी विषयांवार बालरोगतज्ञ संघटन सकारात्मक काम करीत आहे.
बालरोग तज्ञाच्या जळगाव शाखेची बैठक
वैद्यकीय सेवेच्या प्रारंभीच्या काळात जळगाव जिल्हा रुग्णालयात बालरोगतज्ञ म्हणून मी जवळपास वर्षभर सेवा दिली. मी अभिमानाने सांगेन की, सिव्हील हॉस्पिटलमध्ये बालरोग विभाग पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे पहिले प्रयत्न मी प्रांमाणिकपणे केले. यात नवजात शिशू अतिदक्षता विभाग सेवेचा प्रारंभ तेव्हाचे आरोग्यमंत्री डॉ. दौलतराव आहेर यांच्या हस्ते झाला होता. या कार्यासाठी मला तेव्हाचे सिव्हील सर्जन डॉ. ना. ज. राठोड यांनी सहकार्य केले. त्याकाळी सिव्हील हॉस्पिटलमध्ये आम्ही चार शिशू जीवरक्षक पेट्या आणल्या होत्या. त्यांची हाताळणी कशी करावी यासाठी परिचारीकांना मुंबईत प्रशिक्षणाला पाठविले. मी सुध्दा तेथे एक वेगळ्या प्रेरणेने काम करीत होतो. पण नंतर काही राजकीय मंडाळींचा हस्तक्षेप व त्रास वाढला. एका जीवरक्षा पेटीत दोन, तीन मुले ठेवा असा दबाव यायला लागला. खरे तर कमी दिवसांची वाढ असलेल्या मुलास इतरांकडून होणाऱ्या  संसर्गाचा धोका असतो. म्हणून एका पेटीत दोन बालके ठेवायला मी नकार देत असे. त्यातून राजकीय नेते व कार्यकर्त्यांचे व माझे वाद होत. अशा कामामुळे मी अस्वस्थ असे. त्यामुळे माझा एक वर्षांचा करार पूर्ण होताच मी सिव्हीलचे काम बंद केले.

खासगी सेवेबाबतही मी थोडा वेगळा होतो. इतरांपरमाणे व्यवसाय वाढीसाठी मी खुप काही प्रयत्न कधी केलेच नाही. माझ्याकडे आलेल्या पेशंटला चांगली वागणूक आणि खात्रिशीर उपचार करीत असे. गरजुंना बील कमी करून देण्यास मी स्वतःच पुढाकार घेई. त्यामुळे पेशंट व त्याच्या नातेवाईकांच्या मौखिक प्रचार-प्रसारातून माझी सेवा वाढली आणि विस्तारली.

आम्ही जळगाव पीपल्स बँकेकडून कर्ज घेवून हॉस्पिटल उभारले होते. कर्ज आणि १८ टक्के व्याज मिळून दरमहा हप्ता होता सव्वालाख रूपये. त्यामुळे मी बाहेर गावी सेवा देणे सुरू केले. किनगाव (ता. यावल) येथे डॉ. बोरसेंकडे, यावल येथे डॉ. मंगला पाठकांकडे आठवड्यातून एक दिवस जात असे. मी आणि डॉ. सीमाने शेंदुर्णी येथे डॉ. चव्हाणांकडे एकत्र सेवा दिली. जवळपास दोन वर्षे अशी सेवा सुरु होती. ग्रामीण भागातील सेवेप्रसंगी मी इतर डॉक्टरांना माझ्याकडे पेशंट पाठवा असे कधीही म्हटले नाही. मात्र, याचा उलटा परिणाम झाला. इतरांना वाटायचे मी गर्विष्ठ आहे किंवा मी तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मलो आहे वगैरे.

मला आठवते, डिसेंबर १९९९ मध्ये आम्ही हॉस्पिटल  सुरू केले आणि जानेवारी २००० मध्ये डॉ. सीमाला पूत्ररत्न झाले. त्यानंतर दोन महिने तीची सेवा बंद होती. दरमहा सव्वालाखांचा जुगाड करण्याची जबाबदारी माझ्यावर आली. पण योगायोग म्हणा की, आई वडीलांची पुण्याई म्हणा आम्ही आर्थिक अडचणीत कधी आलो नाही. हातात रक्कम कमी असली तरी भरणा करेपर्यंत पुरेसा पैसा हाती येत असे. मी वैद्यकीय  सेवा देताना पेशंटला कधीही बिलासाठी अडवून बघितले नाही अथवा नाकारले नाही, वेळप्रसंगी पैसे नसतील तर नंतर द्या पण केवळ त्यामुळे उपचार थांबवू नका असा प्रामाणिक सल्ला गरजूंना देत गेलो. पेशंटची गर्दी वाढवायला कधीही इतर मार्ग आम्ही अवलंबिले नाही. माझ्याकडून सुधारलेले आणि बिलात सूट दिलेले पेशंट व त्यांचे नातेवाईक माझा प्रचार-प्रसार करीत. यातून माझी रुगणसेवा स्वबळावर वाढत राहिली.

माझा मूळ पिंड मित्र जमवणे व समाजकार्य करणे असल्याने हॉस्पिटलच्या कामातून वेळ काढून मी रोटरी क्लब, डॉक्टरांचे संघटन IMA अशा कार्यात लक्ष घालायला सुरु केली.

रोटरी क्लब जळगांव वेस्टचा मी सदसय झालो, त्यानंतर विविध जबाबदारी पार पाडत २०११/१२ करिता अध्यक्ष झालो. आय. एम. ए. जळगावचा आमच्या डॉक्टरांचा अॉर्केस्ट्रा "मेडिबीटस्" पुढाकार घेऊन स्थापन केला. तो आजही नावलौकिक मिळवून आहे.

आमचा कुटूंब विस्तार, लांबचे आणि जवळचे नातेवाईक भरपूर होते. मी सेवा सुरू केल्यानंतर लांबचे नातेवाईक उपचारासाठी येवू लागले. पण, जवळचे नातेवाईक येत नसत. कालांतराने हाॅसपिटलचा नावलौकिक झाल्यावर तेही यायला लागले. मला डॉ. सौ. सीमाविषयी सांगावे लागेल की, ती हॉस्पिटलमध्ये कडक शिस्तीची म्हणून प्रसिद्ध आहे पण, हॉस्पिटलमध्ये पेशंट म्हणून आलेल्या नातेवाईकाला घरी आणून त्यांचे आदरातिथ्यही ती तेवढ्याच जबाबदारीने करते. त्यामुळे आमचे अनेक नातेवाईक आमच्याशी जुळून असून संपर्कात आहेत. माझ्या आई-वडीलांनीही असेच नातेवाईक व संबंध जपले. मला नातेवाईकांचा मोठा गोतावळा असल्याचा आनंद आहे आणि सार्थ अभिमानही आहे.

तूर्त एवढेच ... आता थांबू या !! णणण

No comments:

Post a Comment