![]() |
| डॉ. राजेश पाटील आणि डॉ. रेशमा उपाध्ये |
मी लोणी येथे एमबीबीएसला असताना कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये गाणी गायचो. किशोरकुमार आवडता गायक. त्याच्या आवाजात गायचा प्रयत्न करायचो. मित्रांना गाणे आवडायचे. ते प्रोत्साहन द्यायचे. नंतर जळगावला मी आणि सौ. सिमाने विश्वप्रभा हॉस्पिटलचा व्याप वाढवला. गाण्याचा छंद मागे रेंगाळला. एक दोन वर्षानंतर व्यवसायात थोड स्थिरस्थावर झाल्यावर पुन्हा गाणे डोक्यात घुसले. सन २००१/२००२ च्या सुमारास जळगाव शहरात आरोग्यसेवा देणाऱ्या विविध डॉक्टरांचे आगमन होत होते. त्यांच्यातही गाण्यांची आवड असलेली मंडळी होती. एकेदिवशी डॉ. जयंती चौधरी यांच्याकडे मी आणि डॉ. अटल बसलो होतो. तेव्हा डॉक्टरांमधील गायकांचा विषय चर्चेत आला. तेव्हा प्राथमिकस्तरावर ठरले की, गाणाऱ्या डॉक्टरांना एकत्र आणायचे.
सर्वश्री डॉक्टर हेमंत केळकर, श्रीश्रीमाळ, दीपक आठवले, मिलींद राणे, धनंजय बोरोले, रणजित चव्हाण असे अनेकजण एकत्र आलो. डॉक्टरांचा अॉर्केस्ट्रा करायचा हा निर्णय झाला. त्याला साजेसे "मेडिबीटस्" हे समर्पक नाव मी सूचविले. तेव्हा आएमए जळगाव शाखेचे अध्यक्ष डॉ. सरुप लोढा व सचिव डॉ. दीपक पाटील होते. त्यांनीही कल्पना उचलून धरली आणि डॉक्टरांच्या "मेडिबीटस्" चा पहिला कार्यक्रम जळगाव जिल्हा बँकेच्या जे. एस. अप्पा पाटील सभागृहात करण्याचे ठरले. डॉ. सुभाष चौधरी, डॉ. सुदर्शन नवाल, डाॅ. कडुसकर यांच्यासारख्या अनेक जेष्ठ मंडळींचे प्रोत्साहन मोलाच ठरले.
अॉर्केस्ट्रा करायचा म्हटल्यावर संगीत आले. आमच्यात वाद्ये वाजविणारे नव्हते. आम्ही जळगावातील ज्येष्ठ संगीतकर्मी अप्पा नेवेंशी संपर्क केला. त्यांनी गाणी बसविण्याची जबाबदारी स्वीकारली. मग सराव सुरु झाला. एकेकाच्या सहभागाने उत्साह वाढला. कार्यक्रमाचे संयोजन विविधांगाने फुलू लागले. गाण्याच्या सरावासाठी हॉस्पिटलचे काम संपवून रोज रात्री साडेआठ/ नऊला गोलाणी मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावरील म्युझिक स्टेशनवर गायक डॉक्टर मंडळी जमू लागली. कधी कोणाकडून चहा तर कोणाकडून बिस्कीट मिळत. त्या १०/१२ रात्री उशीरापर्यंत धम्माल असायची. आज ही डोळ्यांसमोर प्रसंग तरळून जातात.
"मेडिबीटस्" चा पहिला कार्यक्रम ठरलेल्या रात्री मोठ्या धूमधडाक्यात झाला. रसिकांच्या उत्सुकतेने आणि उपस्थितीमुळे सभागृह तुडूंब भरले होते. प्रत्यक्ष रंगमंचावर डॉक्टरांमधील अनेक हरहुन्नरी कलावंत समोर आले. डॉ. बगडीया यांनी शब्दांवर प्रभुत्व दाखवत शेरोशायरी सादर केली. डॉ. अटल यांनी बहारदार चारोळ्या सादर केल्या. डॉ. ज्योती गाजरे यांनी छोटे-छोटे किस्से सांगितले. गायक डॉक्टरांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या यशस्वी कार्यक्रमानंतर "मेडिबीटस्" चा उत्साह दुणावला. काही नवे कलावंत आमच्याशी जोडले गेले. त्यात सौ. अलका दिलीप चव्हाण, डॉ. रेशमा उपाध्ये, डाॅ. अजय शास्त्री व सौ. शास्त्री, डाॅ. उदयसिंह पाटील, डाॅ. राजेश जैन, डाॅ. विद्याधर दातार यांचा सहभाग होता. विशेष म्हणजे तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रवीण साळुंखे व जिल्हाधिकारी डाॅ. संजीव मुखर्जी यांनी देखील दुसऱ्या वर्षाच्या "मेडिबीटस्" मध्ये स्वयंस्फूर्तीने गाणी सादर केली.
डॉक्टर मंडळी गाणी म्हणतात, याची नवी क्रेझ निर्माण झाली. "मेडिबीटस्" कडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. दरम्यानच्या काळात त्सुनामीचा कहर झाला. आपदग्रस्तांना मदतीसाठी "मेडिबीटस्" चा कार्यक्रम करायचे ठरले. या कार्यक्रमास तिकीट लावले. आश्चर्य म्हणजे रसिकांनी एवढा प्रतिसाद दिला की, दीड लाखांचा धनदेश "आयएमए"ने त्सुनामीग्रस्तांसाठी मदत म्हणून दिला.
नंतरच्या काळात "मेडिबीटस" पाचोरा येथेही सादर झाले. दरवर्षी "मेडिबीटस्" सादर करण्याची परंपरा निर्माण झाली. या कार्यक्रमामुळे डॉक्टर मंडळीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. सर्वजण सहकुटूंब एकत्र येवू लागले. २-३ वर्षानंतर भुसावळची काही उत्साही डाॅक्टर मंडळी देखील "मेडिबीटस्" मध्ये सहभागी होवू लागले. यात डाॅ. दावलभक्त, दिनेश नेहते, जान्हवी पाटील, डाॅ. सौ. अत्तरदे, डाॅ, केळकर दाम्पत्य यांचा समावेश होता. इतरही डाॅक्टर गाणी ऐकण्यास नियमित येऊ लागली.
सन २००४ च्या सुमारास एक संधी चालून आली. "आयएमए"ने राष्ट्रीयस्तरावर डॉक्टर मंडळींसाठी गाण्याची स्पर्धा ठेवली होती. प्रत्येक आयएमएकडून ३ एन्ट्री कॅसेटमध्ये रेकाॅर्ड करुन मागविली होती. महाराष्ट्रातील गाण्यांची छाननी पुण्यात होती. एकल गीत आणि द्वंद्व गीत म्हणायचे होते. मी, डॉ. हेमंत केळकर व डॉ. रेशमा उपाध्ये आम्ही सहभाग घेतला. पुण्याच्या परिक्षकांनी कैसेटमधील गाणी ऐकून माझी आणि डॉ. उपाध्ये यांची द्वंद्व गितासाठी आणि डाॅ. रेशमाची एकल गितासाठी निवड केली. महाराष्ट्र चमुत आम्ही क्रमांक ३ वर होतो. लता-किशोरच्या आवाजातील "हाल कैसा है जनाब का?" हे गाणे आम्ही निवडले होते. अप्पा नेवेंनी कसून सराव करून घेतला होता. अखेर फायनल राऊंडसाठी आम्ही अहमदाबादला रवाना झालो.अहमदाबादमध्ये जोरदार चुरस होती. हरिद्वार, मेरठ, गाझीयाबाद, चंदीगड, नगर, यवतमाळ, दिल्ली आदी ठिकाणचे संघ होते. पहिला दिवस सरावाचा होता. मी आणि डॉ. उपाध्ये आम्ही इतरांचा अंदाज घेतला. दुसऱ्या दिवशी टागोर सभागृहात फायनल स्पर्धा होती. सभागृह अगदी पॉश, चकाचक होते. नावाजलेले तीन परिक्षक होते. आम्ही दडपण न घेता गायचे ठरविले. तसेच गायलो आणि जागेवर बसलो. निकालाची उत्सुकता होती पण आपण विजेते होवू हा विश्वास नव्हता. परिक्षकांनी निकाल वाचला आणि कानावर विश्वास बसणार नाही असा निकाल ऐकू आला. मला व डॉ. रेशमा उपाध्ये यांना राष्ट्रीयस्तरावर गाण्याचे पहिले पारितोषिक जाहीर झाले. आम्ही स्वप्नवत वातावरणात पारितोषिक स्वीकारले. तेव्हा मोबाईल फोनवरून स्टेजवरुनच जळगावी डाॅ. हेमंत केळकरांना निकाल सांगितला. दुसऱ्या दिवशी जळगाव रेल्वेस्थानकावर उतरलो तेव्हा अनेक मित्र अभिनंदनासाठी आले होते. प्रेस फोटोग्राफर शब्बीर सय्यद तेथे होते. त्यांनी ट्रॉफीसह आम्हा दोघांचा फोटो दै. सकाळ पान १ वर प्रसिध्द केला. त्यानंतर जळगाव "आयएमए" ने सत्कार केला. "महाराष्ट्र आयएमए" ने महाबळेश्वर येथील कॉन्फरन्समध्ये मला व डॉ. उपाध्ये यांना खास निमंत्रण देवून बोलावले. आमचा जंगी सत्कार केला. यावेळेस डॉ. सतीश गुप्ता योगायोगाने महाबळेश्वरात होते. त्यांनी आमच्या सन्मानार्थ खास डिनरचे आमंत्रण दिले. ते दिवस आमच्यासाठी "सोन्याचे दिवस" होते. आजही त्या आठवणी मनाला प्रसन्न करतात.
"मेडिबीटस्" ने मला गायक म्हणून ओळख दिली. नंतर अनेक कार्यक्रमात एखाद-दुसरे गाणे म्हणायची संधी मिळाली. अप्पा नेवे, मोहनजी तायडे आदी संगीत क्षेत्रातील मंडळी इतरत्र बोलावतात रफी, मुकेश, किशोर, मन्नाडे, आर. डी. बर्मन आदींच्या स्मृतीनिमित्त होणाऱ्या गायन कार्यक्रमात माझा सहभाग असतोच. रोजच्या त्याच त्या कामात गायकीने मला विरंगुळा, आराम दिला. एक "स्पीड ब्रेकर" चे काम हा छंद करतो. शक्यतो मी गाण्याची संधी नाकारत नाही. दरम्यानच्या काळात रोटरी क्लबच्या "रोटो स्पोटर्स २०११" मध्ये मला सर्वोत्तम गायकाचा पुरस्कार मिळाला.
अलिकडे काही वर्षांपासून "मेडिबीटस्" चे संयोजन गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात होते. काही नवीन डाॅक्टर गायक देखील चांगला सहभाग घेतात. बहुधा शहराबाहेर लांब आयोजन होत असल्यामुळे जुन्यातील अनेकांचा सहभाग कमी असतो. मात्र, मेडिकल काॅलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित असतात."मेडिबीटस्" च्या आठवणी म्हणजे आयुष्यातील सुमधूर तराणेच आहे.
थांबू या. पुन्हा भेट नव्या विषयासह...!"





Khup khup surekh Sir...Vachun khup aanand zala..Hats off Sir..
ReplyDeleteव्वा,राजेश-रेश्मा,हार्दिक अभिनंदन! राजेश,तू लिहितोसही छान,लिखते रहो,गाते रहो!!💐💐👍🙏
ReplyDelete