Friday, 20 May 2016

सिव्हील हॉस्पिटलमध्ये "रोटरी निओ केअर सेंटर"


रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टचा अध्यक्ष असताना मी दोन चिरकाल स्मरण राहतील असे उपक्रम केले. माणसाच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंतची दोन उपयुक्त कामे त्यावेळी खूप चर्चेत राहिली. वृत्तपत्रांनी त्यावेळी या दोन्ही उपक्रमांना भरभरून प्रसिद्धी दिली. अमरधामजवळ विसावा बांधण्यासाठी मी आणि क्लबचे सचिव किरण कक्कड अशा दोघांनी निधी खर्च केला होता. मात्र, त्यापूर्वी केलेल्या एका कार्यासाठी रोटरी इंटरनॅशनलचा सुमारे १५ लाखांचा निधी पहिल्यांदा जळगाव रोटरी वेस्ट क्लबला मिळाला.

रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टच्या अध्यक्षपदाची सूत्रे मी दि. १ जुलै २०११ ला स्वीकारली. विनोद बियाणी मावळते अध्यक्ष होते. या पदग्रहण कार्यक्रमास रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३० पुणेचे माजी प्रांतपाल डॉ. माधव बोराटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रोटरी क्लबची दर आठवड्याला बैठक असते. आमची बैठक दर गुरूवारी व्हायची. अध्यक्ष असल्यामुळे मला प्रत्येक बैठकीला जाणे आवश्यक होते. हे लक्षात घेवून त्यावेळी मी माझ्या हॉस्पिटलमध्ये एक बोर्ड लावला. पेशंटांच्या नातेवाईकांना सूचना दिली की, दर गुरूवारी मी सायंकाळी ७ वाजेनंतर उपलब्ध असणार नाही. ते वाचून पेशंटांच्या नातेवाईंकांची गैरसोय टळू लागली. ते स्वतः गुरूवारी बालकांनाचा लवकर घेवून येवू लागले. मी स्वतः क्लबची साप्ताहिक बैठक टाळली नाही.

या काळात रोटरी इंटरनॅशनलच्या आर्थिक पाठबळावर सामाजिक व समुह विकासाच्या अनेक योजना तथा प्रकल्प राबविणे सुरू झाले होते. रोटरी क्लबकडून नाविन्यपूर्ण प्रस्ताव मागविले जात. त्यावरील खर्चाचा आढावा घेवून आंतराष्ट्रीय, रॉष्ट्रीय डिस्ट्रीक्ट आणि स्थानिक क्लबचा निधी मिळवून तो प्रकल्प पूर्ण केला जात असे. त्याला "मॅचिंग ग्रॅन्ड" प्रोजेक्ट म्हणत. आजही तशी पद्धत आहे. तिला ग्लोबल ग्रॅन्ड म्हणतात. 

मी अध्यक्ष असताना असा मेगा प्रकल्प आपणही सादर करावा अशी कल्पना समोर आली. आम्ही सर्व सदस्य काय करावे ? हा विचार करीत होतो. त्यावेळी माझ्या लक्षात आले की, माझ्याच हॉस्पिटलमध्ये अपूर्ण दिवसांच्या, अतिगंभीर नवजात शिशूंच्या उपचार करतेवेळी पुरेशा साधनांच्या उपलब्धते अभावी किंवा कधी पालकांच्या आर्थिक दुर्बलतेमुळे अनेक बालकांना सरकारी रुग्णालयात नाईलाजाने पाठवावे लागायचे. शिवाय, खासगी हॉस्पिटलमध्ये अशा जीवरक्षक पेटीत बालकांना ठेवण्याचा रोजचा खर्च कमीत कमी २ ते ३ हजारांवर जातो. शिशू जास्त दिवस त्या पेटीत राहिले तर खर्च वाढतो. सर्व सामान्य कुटुंबाला हा खर्च परवडत नाही. कृत्रिम श्वासोच्छवास मशीनची गरज लागल्यास सुमारे ५५०० ते ६००० रुपये एवढा रोज खर्च लागत असे. यामुळे बरीच बालके उपचारांअभावी दगावत.
 
हा खर्च टाळण्यासाठी व गरजू, गोरगरीब कुटुंबातील नवजात शिशुंवर प्रभावी उपचारांसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्येच "निओ केअर सेंटर" सुरू केले तर सर्व सामान्यांना कमी खर्चात ही सुविधा उपलब्ध होईल आणि आपल्यालाही क्लबमार्फत चांगले काम केल्याचे समाधान मिळेल, असे माझ्या लक्षात आले. मी सचिव व इतर पदाधिकाऱ्यांना हा प्रकल्प सांगितला. या प्रकल्पात नवजात शिशूसाठी जीवरक्षा पेट्या आणि इतर साहित्य तसेच व्हेंटीलेटर (कृत्रिम श्वास देणारे मशिन)आपण रोटरी इंटर नॅशनलच्या मदतीने सिव्हील हॉस्पिटलसाठी देण्याचे सूचविले. क्लबच्या सर्व मंडळींनी प्रकल्पाला हिरवा कंदिल दिला.

मी स्वतःच बालरोग तज्ञ असल्यामुळे अत्यंत योग्य पद्धतीने प्रकल्प अहवाल तयार केला. माझ्या हॉस्पिटलमध्ये असलेल्या अद्ययावत गुणवत्तेचीच यंत्रणा देण्याचे आम्ही ठरविले. त्यानुसार ३ जीवरक्षक पेट्या, २ सिरींज पंप, २ पल्स ऑल्टीमीटर, २ फोटो थेरपी (काविळसाठी), व्हेंटीलेटर (कृत्रिम श्वासोच्छवासासाठी) २ निओनेटल सक्शन मशिन आदी साहित्य देण्याचे ठरविले. त्यासाठी अपेक्षीत खर्च होता सुमारे १५ लाख रुपये. यापैकी स्थानिक क्लब म्हणून आम्ही काही रक्कम तसेच मॅचिंग ग्रॅन्ड पार्टनर क्लब, रोटरी क्लब कलवहर सिटी, कॅलेफोर्निया, अमेरिका यांनी व डिस्ट्रिक्ट ३०३० तसेच मॅचिंग डिस्ट्रिक्टने काही रक्कम दिली. उर्वरित रक्कम रोटरी इंटरनॅशनलकडून मिळाली. त्याद्वारे घेतलेले सर्व साहित्य सिव्हील हॉस्पिटलला प्रदान करण्यात आले. नवजात शिशुंचा तेथील कक्ष अद्ययावत झाला. तेथे दरमहा अपुऱ्या दिवसांचा जन्म झालेल्या बालकांची व उपचारांसाठी येणाऱ्या बालकांची संख्या २००-२५० वर होती. त्याच्यातील बऱ्याच जणांना या कक्षातील यंत्रणेचा लाभ मिळणार होता.
 
तेव्हाचे जिल्हाधिकारी राजूरकर, पोलीस अप्पर अधीक्षक इशू संधू, मनपा आयुक्त बोखड, जि. प.  मुख्याधिकारी निरुपमा डांगे, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन तसेच रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ. सिकची, संग्रामसिंग भोसले, त्यावेळेचे प्रांतपाल गोपाल शिराळकर व इतर बहुसंख्य सदस्य उपस्थित होते. तेव्हा अमेरिकेतील रोटरी क्लब कलवहर सिटीचे अध्यक्ष अॅन मुरकामी आणि इतर पाचजण असे या कार्यक्रमास गेस्ट म्हणून खास अमेरिकेहून आले होते. ही मंडळी रोटरी पदाधिकाऱ्यांकडे मुक्कामी होती. या कार्यक्रमास स्थानिक वृत्तपत्रांनी जोरदार प्रसिद्धी दिली.

रोटरीने केलेल्या या परिश्रमांचे पूर्ण फलित मात्र काही झाले नाही. लालफितीचे काम आणि दहा दा थांब, असा मला अनुभव आला. आम्ही दिलेल्या शिशूरक्षा यंत्रणेसाठी सेंट्रल ऑक्सिजन (एकाचवेळी अनेकांना ऑक्सिजन पुरवठा करता येईल अशी यंत्रणा) आवश्यकता होती. बालकांच्या रक्षणासाठी महागड्या पेट्या आम्ही दिल्या. पण, व्हेन्टीलेटरची व्यवस्था सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आजपर्यंत झाली नाही. दुसरीकडे, बालरोग विभागातील डॉक्टरांना बालमृत्यूसाठी जबाबदार ठरवून तुरुंगात पाठविण्यात आले. सरकारच्या या अजब कारभाराचा निषेध बालरोगतज्ञ संघटनेनेही केला.

खरेतर रोटरीने पुढाकार घेतल्यानंतर सिव्हील हॉस्पिटलमध्ये एनआरएचएम या कार्यक्रमांतर्गत अत्याधुनिक सेवांनी युक्त प्रसुतीगृह आणि शिशूरक्षा विभाग सुरू झाला. तेथे दोन बालरोगतज्ञांची नियुक्ती झाली. नर्स वाढल्या. इतर स्टाफ वाढला. वर्षभरात सिव्हिलच्या बालरोग विभागात सरासरी २ हजारवर बालरुग्ण दाखल होतात. त्यापैकी सरासरी ४४० वर बालमृत्यू विविध कारणांमुळे नोंदले गेले, त्यातील काही शिशू बालकांचा जीव वाचवता येईल या हेतूने रोटरीने सिव्हिलमध्ये साहित्य दिले होते. गेल्या चारवर्षांत त्याचा पुरेपूर वापर जिल्हा शल्यचिकित्सक किंवा तेथील यंत्रणा करू शकलेली नाही. माझ्या कार्यकाळीत प्रकल्पाचे हे वास्तव अस्वस्थ करणारे आहे. मी वारंवार तेथे पाठपुरावा केला. आश्वासनांच्याशिवाय काहीही मिळालेले नाही. आता असे वाटते की, आपण सद्हेतूने व सत्पात्री केलेले दान परत मागून घ्यावे.

रोटरी अध्यक्ष म्हणून माझ्या कार्यकाळातील अजून एक चांगली कामगिरी म्हणजे, मायादेवी नगरातील रस्त्याला आम्ही "रोटरी भवन मार्ग" हे नाव दिले. यासाठी जळगाव नगरपालिकेने ठराव करून दिला. बहुधा हे महाराष्ट्रातील पहिले उदाहरण असावे की, जेथे रस्त्याला रोटरीचे नाव दिले आहे. या उपक्रमाचा फोटो रोटरीच्या मासिकात मुखपृष्ठावर झळकला. 

आज एवढेच.

भेटू नंतर नव्याविषयासह.

No comments:

Post a Comment