विश्वप्रभा हॉस्पिटलचा विस्तार टप्प्याटप्याने होत गेला. संपूर्ण जिल्हाभरातून रुग्णांची संख्या वाढू लागली. नेहमीचे काम करीत असताना
वैद्यकिय संघटनेच्या सोबतच इतर सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था, संघटनांशीही माझा संपर्क येवू लागला. सामाजिक व सार्वजनिक सेवेत काम करणाऱ्या व्यक्तीने कार्याच्या विस्तारासाठी अशा संस्थांमध्ये सहभागी होणे किंवा त्यात पदाधिकारी होवून सामाजिक उपक्रामांची जबाबदारी स्वीकारणे ही सुद्धा संधी असते. तशी संधी मलाही मिळाली होती. मी रोटरी जळगाव (वेस्ट) क्लबचा अध्यक्ष झालो होतो.
वैद्यकिय संघटनेच्या सोबतच इतर सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था, संघटनांशीही माझा संपर्क येवू लागला. सामाजिक व सार्वजनिक सेवेत काम करणाऱ्या व्यक्तीने कार्याच्या विस्तारासाठी अशा संस्थांमध्ये सहभागी होणे किंवा त्यात पदाधिकारी होवून सामाजिक उपक्रामांची जबाबदारी स्वीकारणे ही सुद्धा संधी असते. तशी संधी मलाही मिळाली होती. मी रोटरी जळगाव (वेस्ट) क्लबचा अध्यक्ष झालो होतो.
जुलै २००११ ते जुन २०१२ दरम्यान मी रोटरी क्लब जळगांव वेस्टचा अध्यक्ष होतो. वर्षभर अनेक उपक्रम राबविले. त्याची माहिती स्वतंत्रपणे सविस्तर देणार आहेच मात्र, माझ्या कारकिर्दीचे अवघे तीन दिवस शिल्लक असताना मी आणि तत्कालीन सचिव किरण कक्कड आम्ही दोघांनी मिळून एक वेगळाच कार्यक्रम दोघांच्या सहभागातून राबविला. अर्थात, त्याला इतर पदाधिकारी व सदस्यांची मंजुरी होतीच त्याच्या विषयी आज सांगतो.
सन २००२ च्या नोव्हेंबरमध्ये माझ्या वडिलांचे निधन झाले. तेव्हा अंत्यविधीसाठी जळगावच्या वैकुंठधाममध्ये वडिलांचे पार्थिव नेण्यात आले होते. वैकुंठधामजवळ गेल्यानंतर पार्थिव थोड्यावेळासाठी खाली ठेवले जाते. त्याला विसावा म्हणतात. तेथून पुन्हा कौटुंबिक मंडळी खांदा देतात. वडिलांचे पार्थिव वैकुंठधामजवळ खाली ठेवताना लक्षात आले होते की, हा परिसर अस्वच्छ आहे. रस्त्यावरच विसाव्याचा प्रकार करावा लागतो. ज्यांना जेथे वाटेल तेथे विसाव्यासाठी पार्थिव खाली ठेवतात. त्याची जागा निश्चित नव्हती. त्यानंतर इतरवेळी अनेकदा अंत्ययात्रांना गेलो तेव्हाही हाच प्रकार लक्षात आला. पावसाळ्यात तर पार्थिवाची अवहेलनाच व्हायची, शिवाय रहदारीचा खोळंबा नेहमी ठरलेला , हा प्रकार अनेक वर्षे मला दरवेळी खटकत होता. दरम्यानच्या काळात अमरावती येथे एका निकटवर्तीयाच्या पत्नीचे निधन झाल्यामुळे तेथे अंत्यविधीसाठी जाण्याचा प्रसंग आला. त्याठिकाणी वैकुंठधामच्या बाहेर विसावा म्हणून एका आकर्षक चौथऱ्याचे बांधकाम केलेले मी पाहिले. मला जळगाव वैकुंठधामची समस्या आठवली. हा विषय तेव्हा पासून डोक्यात घट्ट बसला.
जळगावला आल्यानंतर मी महानगर पालिकेत संपर्क करून रोटरी क्लबच्या माध्यमातून विसावा बांधून देण्याचा प्रस्ताव दिला. तेव्हा विष्णूभाऊ भंगाळे महापौर होते आणि रमेशदादा जैन हे सत्ताधारी गटाचे प्रमुख होते. दोघांनी रोटरीच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला. पण, महासभेत झाले उलटे. लोकांच्या भावना दुखावतील असा आक्षेप घेवून नगरसेवकांनी या विषयाच्या ठरावाला विरोध करीत तो नामंजूर करून टाकला. याच काळात तीन दिवसांनी म्हणजे ३० जून २०१२ ला माझ्या अध्यक्षपदाची मुदत संपणार होती. त्यामुळे मी रमेशदादा व विष्णूभाऊ यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांना विसावा चौथऱ्याची गरज समजून सांगितली. यात कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत तर वैकुंठधाममध्ये अंत्यविधीस येणाऱ्या सर्वांचीच सोय होणारआहे हे लक्षात आणून दिले. विसावा चौथऱ्याचे बांधकाम मी व किरण कक्कड असे दोघेच स्वतःच्या निधीतून करणार होतो. त्यामुळे इतर विषयांचा अडथळा नव्हता. अखेर जैन आणि भंगाळेंनी विरोध करणाऱ्या नगरसेवकांना समजावले. अवघ्या तीन दिवसात महापालिकेची रितसर मंजुरी घेवून विसावा चौथऱ्याचे ग्रानाईट वापरून आकर्षक पद्धतीने बांधकाम करण्यात आले.
जैन, भंगाळे आणि रोटरीच्या इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विसावा चौथरा लोकांना अर्पण करण्यात आला. त्यादिवशी जोरदार पाऊस सुरू होता. भर पावसात कार्यक्रम झाला. आता जवळपास चार वर्षे होत आली. शहरातील कोणत्याही भागातून अंत्ययात्रा अथवा वाहनाद्वारे वैकुंठधाममध्ये आणले जाणारे पार्थिव विसावा देण्यासाठी या चौथऱ्यावर ठेवले जाते. घाण, माती यापासून होणारी त्याची अवहेलना थांबली आहे. तेथे इतरांना उभे राहाता येते. पार्थिवाचा पुढील प्रवास निटपणे होतो. रहदारीचा होणारा खोळंबादेखील बराचसा कमी झालाय....आज हे सारे पाहताना रोटरी वेस्टच्या माध्यमातून समाजाच्या गरजेचे एक चांगले काम केल्याचे व्यक्तिगत समाधान मला मिळते. अलिकडे अजून एक अडचण जाणवायला लागली आहे. ती म्हणजे, विसाव्यावर पार्थिव ठेवले जाते मात्र, त्या विसावाच्या लगत अंत्यविधीस येणारी मंडळी वाहने उभी करू लागली आहेत. त्यामुळेही काही प्रमाणात गैरसोय होताना दिसते. मी पुन्हा महानगरपालिकेस पत्र देवून या विसावाच्या जवळ नो पार्किंगसाठी लोखंडी पाईप लावण्याचा विचार करीत आहे. लवकरच या विषयी कार्यवाही करणार आहे.
रोटरीच्या माध्यमातून स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचा निधी मिळून अनेक लहान – मोठी विकास कामे केली जातात. प्रत्येक कामाचे एक महत्त्व असते. माझ्या बाबतीत एक उल्लेख मी करेन की, मी रोटरीचा अध्यक्ष असताना सर्व प्रथम नवजात शिशूंच्या जीव रक्षणासाठी निओ- केअर सिस्टिम जळगाव जिल्हा रुग्णालयास उपलब्ध करून दिली. त्यानंतर क्लबच्या अध्यक्षपदावरून उतरताना अंत्यविधासाठीचा विसावा तयार करून दिला. जन्मापासून तर मरणापर्यंतची ही दोन लक्षात राहणारी कामे मी केली. आजही इतर पदाधिकारी या कामांचा कौतुकाने उल्लेख करतात. मला असा कामांमध्ये पूर्वी पासून रस आहे. समाजातील काही प्रथा, परंपरा दलायला हव्यात याविषयी मी नेहमी परखड मत मांडतो. नव्या प्रथा, परंपरा या व्यावहारिक असाव्यात आणि त्यात सर्व सामान्यांचा लाभ व्हावा हाच माझा हेतू असतो. विसावा चौथऱ्याला नगरसेवकांचा विरोध होवू नये म्हणून मी अनेकांशी वारंवार चर्चा केली. त्यांनीही ते एकून घेतले. याचा उल्लेख मला आज येथे समाधानाने करता येत आहे. मी सुद्धा आनंदी आहे.या वर्षी पुन्हा रोटरीची मोठी जबाबदारी आहे. मी रोटरी ३०३० या प्रांताचा उपप्रांतपाल आहे, जळगाव वेस्ट सह, जळगावातील दोन व भुसावळ आणि अमळनेर येथील एक क्लबची २०१६-१७ चया कामांची आखणी करायची आहे....
थांबू या ... पुन्हा भेटू नवा विषय घेवून ..



No comments:
Post a Comment