Thursday, 2 June 2016

"मराठा-मंगल" ... विवाह पद्धतीत प्रबोधनाचा वसा !!

मराठा मंगल च्या मोबाईल व्हॅनचे लोकार्पण

महाविद्यालयीन जिवनापासून मला स्वतःला काही ना काही काम लावून घ्यायची सवय आहे. डॉक्टरांचे संघटन असेल, रोटरी क्लब असेल किंवा इतर सामाजिक संघटना असतील त्यांच्यासोबत विविध समाजोपयोगी उपक्रमात सक्रीय सहभागी व्हायला मला आवडते. आपण समाजात राहतो, समाजासाठी व्यवसाय करतो, समाजाकडून काही तरी मिळवतो मग, त्या समाजाचे आपण काही तरी देणे लागतोहा माझा व्यक्तिगत कृतीसंकल्प आहे. त्याचाच एक भाग म्हणून मी आणि माझे सहकारी तथा माहिती क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते आर. बी. नाना पाटील मिळून मराठा मंगलया नावाने मराठा समाजातील विवाह व प्रबोधन स्वयंसेवी संस्थेच्या कामाला आम्ही प्रारंभ केला आहे.

मराठा समाजात उपवर वर, वधुची विवाह जुळणी करताना सध्या जाणवणाऱ्या अडचणी आणि त्यात काळानुरूप बदलाची गरज हा एक साधा सोपा विषय घेवून आम्ही ही संस्था सुरू केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून एक मोबाईल व्हॅनचा वापर करीत समाजाच्या दारापर्यंत पोहचून उपवर वर, वधुंची नोंदणी आम्ही करणार आहोत. संबंधितांकडून परिपूर्ण माहिती व आवश्यक ती कागदपत्रे घेतली जाणार आहेत. एक जबाबदार मध्यस्थाची भूमिका मराठा मंगलही संस्था करणार आहे.

मोबाईलव्हॅनची पूजा करताना श्रीमती प्रतिभा विश्वासराव पाटील
पूर्वीच्या काळी मराठा समाजात विवाह जुळणीचे काम करणाऱ्या काही व्यक्ती होत्या. त्या सतत उपवर वर, वधुंची माहिती गोळा करून गरजू पालकांना देत असत. गावातील प्रतिष्ठीत मंडळींच्या सहभागाने विवाह जुळणी होत असे. मात्र, अलिकडच्या काळात विवाह जुळणी करणाऱ्या व्यक्ती कमी झाल्या आहेत. लोकांनाही स्वतःसाठी द्यायला वेळ नाही. अशा प्रसंगी उपवर वर, वधुंची माहिती गोळा करणे हे काम विना लाभाचे आणि वेस्ट ऑफ टाइममानले जाते. ऑनलाईनच्या माध्यमातू काही प्रमाणात विवाह जुळणी केली जाते. पण त्यात चुकीची माहिती किंवा अपूर्ण माहिती असल्यामुळे विवाहपश्चात इतर प्रश्न निर्माण होताना दिसतात. या सर्व बाबींचा विचार करून आम्ही मराठा मंगल  संस्थेच्या कामकाजाची दिशा, नियम व अटी ठरविल्या आहेत.

विवाह जुळणीच्या कार्याविषयी सध्या अनेक गैरसमज आहेत. आमची मुलगी सुंदर आहे त्यामुळे आम्हाला वर शोधण्याची गरज नाही, घर बसल्या येतील, आमचे नातेगोते मोठे आहे, त्यामुळे आम्हाला नात्यातच मुले- मुली मिळतात, ज्यांना स्थळ येत नाही तेच अशा संस्थांकडे जातात आणि अखेरचा गैरसमज म्हणजे, ज्यांचे पाहाणारे कोणी नाही त्यांनी विवाह नोंदणी संस्थेकडे जावे. 

मराठा मंगल ची मोबाईल व्हॅन
वरील गैरसमज बाजूला ठेवून वस्तुस्थिती लक्षात घेतली तर काय दिसते, तर हल्ली लोकांना विवाहस्थळे पाहण्यासाठी आणि त्यांची माहिती काढण्यासाठी वेळ नसतो. फिरण्याचा खर्चही बराच होतो. छोट्या कुटुंबामुळे माणसे आत्मकेंद्री झाली आहेत. बऱ्याच वेळा जुजबी माहितीवर लग्न जुळणीचे प्रकार होतात. मात्र, विवाह संस्थेकडे असलेल्या अनेक मुला, मुलींच्या माहितीतून निवड करण्याचे अनेक पर्याय समोर येतात. फोटो, परियच, संपर्क क्रमांक वगैरे माहिती देण्याची जबाबदारी विवाह संस्था सांभाळते. नव्या कुटुंबात संबंध जुळणी करताना परिचय वाढतो. नवी नाती व नवीन गावे जोडली जातात. अनोळखी ठिकाणी किंवा फारशी माहिती नसलेल्या कुटुंबातील स्थळांची माहिती काढून देण्याची जबाबदारी विवाह संस्था आणि त्याच्याशी संबंधित स्वयंसेवक स्वीकारतात.

भूमिका मांडताना डॉ. राजेश पाटील
वरील सर्व प्रकारचे वास्तव लक्षात घेवून मराठा मंगलसंस्थेने विवाह जुळणीची सोपी पद्धत स्वीकारली आहे. उपवर वर, वधुंचे पासपोर्ट व पूर्ण आकारातील फोटो घेतले जातील. संबंधितांचे संपूर्ण नाव (आधारकार्ड), वय (जन्म दाखला) शैक्षणिक पात्रता (प्रमाणपत्र), नोकरी (प्रमामपत्र) या विषयी सत्य माहितीच नोंदली जाईल. पुराव्यासाठी कागदपत्रांच्या सत्यप्रती घेतल्या जातील. संस्थेचा परिचय अर्ज प्रत्येकाला परिपूर्ण भरावा लागेल. संस्थेकडे नोंदणी करणाऱ्या उपवर वर, वधुला ओळखपत्र दिले जाईल. संबंधितांच्या संपर्काचे दोन, तीन मोबाईल क्रमांक घेतले जातील. उपवर वर, वधुंचे मोबाईल क्रमांक घेतले जाणार नाहीत. ही सर्व प्रक्रिया मोफत केली जाईल. विधवा, घटस्फोटीता किंवा परितक्त्या यांची नावनोंदणी करताना कायदेशीर दाखले घेतले जातील. विवाह जुळणीसाठी इच्छुकांना उपलब्ध सर्व स्थळांचे पर्याय पाहाता येतील. ती माहिती ठराविक मुद्यांची असेल. संबंधितांना कोणतेही १० पर्याय निवडता येतील. त्या १० पर्यायांची सविस्तर माहिती हवी असल्यास ती विवाह संथेच्या अटीनुसार दिली जाईल.

मराठा मंगल  विवाह व प्रबोधन संस्थेच्या कार्यात उपलब्ध तंत्रज्ञान वापले जाणार आहे. विवाह संस्थेची वेबसाईट www.marathamangal.com सुरू करीत आहोत. फक्त मराठा उपवर वर, वधुंची माहिती घेतली जाईल. वेबसाईटवरची माहिती मोबाईलवर पाहाता येईल. ईमेल, एसएमएस, व्हाट्स ऍप वर स्थळांची माहिती दिली जाईल. उपवर वर, वधुंच्या परिचयाचा मेळावा घेतला जाईल. मराठा मंगलसंस्थेची एक मोबाईल व्हॅन जळगाव जिल्ह्यात गावोगावी जावून उपवर वर, वधुची नोंदणी करणार आहे. या वाहनात नाव नोंदणीच्या सर्व सुविधा व संगणक यंत्रणा असेल.

कार्यक्रमास उपरस्थित मान्यवर
मराठा समाजासाठी हा उपक्रम राबविताना काही गोष्टी, परंपरा यात परिवर्तन घडविण्याची मनापासून इच्छा आहे. पहिली म्हणजे, समाजातील जाती-पोटजाती हा भेद मिटविणे, स्थळ पाहणी, साखरपुडा, लग्न यावरील अनावश्यक खर्च कमी करणे, मानपानाच्या कथित परंपरांना फाटा देणे, समाजात विना हुंड्याच्या लग्नाचे  प्रमाण वाढविणे, विवाहपूर्व उपवर वर, वधुंच्या वैद्यकिय चाचण्यांना प्राधान्य देणे, विवाह नोंदणी सोबत सरकारी लाभाच्या योजनांचा प्रचार प्रसार करणे, लग्न वेळेवर लावणे, अवाजवी खरचिक अशा प्रकारांना फाटा देणे, लग्नात होणारे सत्कार थांबविणे असे हे विषय आहेत. हे एका दिवसात बंद होणार नाहीत पण ते थांबविण्यासाठी टप्प्या टप्प्याने प्रयत्न करता येतील.

मराठा मंगलया उपक्रमाची मूळ योजना आर. बी. नाना पाटील यांनी मांडली. ते म्हणाले, हे कोणी तरी करावे. मी उपक्रम समजून घेतल्यानंतर म्हटले, दुसऱ्या कोणी कशाला करावे, आपणच दोघे मिळून करू या. अखेर आम्ही संस्था नोंदणी करून कामाचा प्रांरभ केला. मराठा समाजाची अवस्था आज डायनासोर सारखी आहे. पृथ्वीवर सर्वांत अजस्त्र व मोठा  प्राणी डायनासोर होता. मात्र, बदलत्या काळानुसार तो बदलला नाही. त्यामुळे तो नामशेष झाला. आज मराठा समाज बहुजन आहे. काही बदल समाजाने स्वीकारुन तसे बदल करायला हवेत. ते केले नाहीतर हा मराठा समाज नामशेष होण्याची भीती आहे. म्हणून सकारात्मक बदलाची प्रक्रिया आम्ही सुरू करीत आहोत. यात राजकारण नाही. जळगाव जिल्ह्यात हा उपक्रम यशस्वी झाल्यानंतर आम्ही तो धुळे, नंदुरबार, नाशिक आदी जिल्ह्यात नेणार आहोत. या उपक्रमासाठी आम्ही काही लोकांना समाजसेवी म्हणून सोबत घेणार आहोत. संस्थेच्या कामाचा व्याप वाढला तर रोजगारही उपलब्ध होवू शकेल. आमच्या पहिल्या पावलास सहकार्य करण्याची तयारी अनेकांनी दर्शविली आहे. ही बाब आश्वासक व प्रेरक आहे. अखेरीस मी म्हणेन ...

"माना की अंधेरा बहुत है घना

लेकिन दिया जलाना मना तो नही ..."

पुन्हा भेटुया आनंदयात्रेतील पुढच्या वाटेवर ...

1 comment:

  1. Best Wishes...!! May God Fulfill All Your Wishes...!!

    ReplyDelete