जळगाव जिल्ह्याच्या
आंदोलनांच्या इतिहासातील “न भुतो
न भविष्यती” असा मराठा क्रांती मोर्चा
दि. २९ ऑगस्टला जळगाव शहरात निघाला. कोपर्डी येथील मुलीवर झालेल्या अत्याचार आणि
नंतर निर्घृणपणे तिची झालेली हत्या या पार्श्वभूमिवर या मोर्चाचे आयोजन औरंगाबाद
पॅटर्ननुसार करण्यात आले होते. मोर्चात सव्वा लाख की दीड लाख की दोन लाख लोक
सहभागी झाले यावर अंदाज बांधले जात आहेत. माझ्या मते खरेतर हा मुद्दा समाजाची
पुढील दिशा भरकटवणारा आहे. कारण, मराठा
समाज संयम राखत एकत्र येतो, ते
सुद्धा पदरचे पैसे खर्च करून आणि समाजाचे एकत्रिकरण दाखविण्यासाठी वेळ देतो हिच खरी
क्रांती आहे.
जळगावच्यानंतर बीडमध्ये
निघालेला मूकमोर्चा पाच लाखांच्या पेक्षाजास्त गर्दीचा होता. ही गर्दी समाजातील
असंतोष, अस्वस्थता दाखवणारी आहे. आता धुले
परभणी, अकोला, जालना, लातूर, बुलढाणा येथेही मोर्चांचे आयोजन केले जात आहे. हा
असंतोष कोणाविषयी आहे तर तो काही सरकारी धोरणांविषयी आहे, समाजातील फक्त स्वत:चाच
विकास करत रहाणाऱ्या प्रस्थापित नेत्यांविषयी आहे, समाजांतर्गत असलेल्या अडचणी, समस्यांविषयी आहे. म्हणूनच मला असे वाटते की, मराठा क्रांती मोर्चानंतर पुढे काय ? यावर मंथन व्हायला हवे.
जळगाव येथे निघालेल्या
मोर्चा पाठीमागे एक वेगळी कहाणी आहे. कोपर्डीची घटना घडल्यानंतर औरंगाबादमध्ये
लाखोंचा मोर्चा निघाला. कोणत्याही राजकिय पक्षाचे आवाहन नसताना. कोणीही प्रायोजक
नसताना. तेथे लोक एकत्र आले आणि महाराष्ट्रातील समाजिक आंदोलनांची दिशा बदलणारा
आदर्श निर्माण झाला. औरंगाबादच्या मोर्चाचा विषय जळगावमध्ये सोशल मीडियात चर्चेत
होता. आपणही असे काही करु शकतो का, किमान
१०, २० हजारांचा मोर्चा निघून शकतो का
? यावर चर्चा सुरू झाली. नंतर मात्र,
मी आपण जळगावात असा मोर्चा काढू शकणारच नाही
अशी खंत व्यक्त करणारी पोस्ट आमच्या "मराठा-मंगल" या गृपवर टाकली,ती वेगवेगळ्या गृपवर व्हायरल झाली. त्यानंतर मात्र
चर्चेने जोर पकडला. काही १२-१४ स्वयंप्रेरित मंडळी एकत्र आली व औरंगाबादला जाण्यास
तयार झाली. अवघ्या
१४ दिवसांत मोर्चाचे नियोजन झाले. विशेष म्हणजे कोणीही राजकारणी मंडळी सुरुवातीला
या १२-१५ लोकांत नव्हती. नंतर झालेल्या पहिल्या नियोजन बैठकीला १००-१२५ लोक होते.
त्यावेळेस औरंगाबाद येथे जावून आलेल्यांनी तेथील आयोजकांचे अनुभव सर्वांसमोर
मांडले. तेथील काही मंडळी २ दिवसांनी जळगावी येवून मार्गदर्शन करणार हे ठरले.
मोर्चा २९ ऑगस्ट, सोमवारीच काढण्याचे ठरले. यानंतर तिसऱ्या दिवशी औरंगाबादकरांच्या
उपस्थितीत झालेल्या बैठकीला ग्रामीण भागातील लोकांसह ५०० वर जण उस्थित होते. हा
तपशील सांगण्याचे कारण एवढेच की, फारशी
तयारी न करता, फारसा प्रचार न करता
जळगावचा मोर्चा लाखांच्या वर उपस्थितीने यशस्वी झाला.
महाराष्ट्रात आता निघणारे
मोर्चे हे खऱ्या अर्थाने लोकचळवळीचे प्रतिक आहेत. कारण आजपर्यंत मूठभर मंडळींनी ढीगभर
मंडळीसाठी केलेली वळवळ म्हणजे चळवळ असा सगळ्यांचा समज होता, परंतु मराठा समाज क्रांती मोर्चाच्या रुपात एकत्र आल्याने लोकचळवळीची
नवी व खरी व्याख्या करुन दिली आहे. हा संदर्भ देण्याचे कारण एवढेच की, अलिकडच्या काळात क्रांती किंवा चळवळ या शब्दांचा
अर्थ मराठे विसरले होते. कृतीशी संबंधच नव्हता. मराठ्यांनी लढाया जिंकल्याचा
इतिहास आहे. पण, आजकालच्या राजकारण व
समाजकारणात मराठे पायात पाय घालणारे, पाय
खाली खेचणारे म्हणून प्रसिद्ध झाले आहेत. मराठाच मराठ्याचा वैरी झाला आहे. अशा
विभाजीत मराठ्यांच्या पोरी-बाळींवर इतरांचे हात पोहचू लागल्याचे वास्तव
कोपर्डीच्या घटनेने समोर आणले आणि झोपलेला मराठा समाज खाडकन जागा झाला.
औरंगाबादमधील महामोर्चाने मराठ्यांच्या असंतोषाच्या हुंकाराची तीव्रता दाखवून
दिली. पुढे या असंतोषाचा वणवा पेटला आहे. मात्र, त्याला आवरण संयमाचे आहे.
हा संयम म्हणजे काय तर,
मोर्चा मनातून अस्वस्थ आहे. मात्र मुखाला
मूकपणाचे आवरण घातले आहे. मोर्चा पारंपरिक नाही. तो गर्दीने धडकी भरविणारा आहेच पण,
स्वयंशिस्तीने बांधील आहे. ही शिस्त छत्रपती
शिवाजी महाराजांच्या मावळ्यांप्रमाणे आहे. रयतेचे नुकसान करु नका अशा आज्ञांचे
पालन करणारी आहे. आज सर्वच माध्यमे जळगावसह सर्व ठिकाणच्या मोर्चातील गर्दी व
लोकांच्या शिस्तीविषयी बोलत आहेत. हा सामाजिक बदल आहे. आदोलनांचे रुप-स्वरुप
बदलणारा हा इतिहास मराठे लिहीत आहेत. महाराष्ट्रात बहुजन असून आम्ही मूकपणे व
संयमाने आमचे म्हणणे मांडतो, हा
संदेश मराठा देत आहेत. त्यामुळे यापुढे संख्याबळावर आंदोलनांच्या नावाने धटींगशाही
करणाऱ्यांना दहावेळा विचार करावा लागेल. कारण मराठा समाजाने एक मर्यादा रेखा आखून
दिली आहे.
या मोर्चाने काय दिले ?
हा विषय नक्कीच चर्चेचा होवू शकतो. मला असे
वाटते या मोर्चाने अनेक समाजिक मापदंड दिले. सर्वप्रथम महिलांवर अत्याचार करणाऱ्या
संभावित प्रवृत्तींना जरब बसेल. कारण एवढ्या प्रचंड संख्येने लोक एकत्र येऊ शकतात
हा इशारा आहे. कुठलाही गोंधळ न घालता, घोषणा
न देता मोर्चा निघतो, पोलिसांना मदत, सहकार्य करता येते व आपली घाण आपणच स्वच्छ करु शकतो,
हा संदेश मोर्चाने इतरांना दिला. सरकारी
यंत्रणेवर कोणताही ताण पडला नाही. एक प्रकारे सार्वजनिक आंदोलनाची आचारसंहिताच या
मोर्चांनी घालून दिली. त्यामुळे आंदोलन करणाऱ्यांवर आता अशा प्रकारे शिस्त पालनाचे
नैतिक बंधन येणार आहे. लोकांच्या मनातील असंतोष पाहून सरकारला काही कायद्यांचे
अवलोकन व पुनर्विचार करावाच लागेल. केवळ मराठाच नाही तर इतरही समाजातील
माता-भगिनींचा आत्मविशवास यातून वाढेल. समाज आपल्या पाठीमागे आहे याची त्यांना
जाणिव होईल. या गोष्टी मराठा समाजासह इतरांनाही लाभाच्या आहे.
मराठा समाजाच्या अंतर्गत
लाभाचीही काही उदाहरणे आहे. लग्न कार्यात मूळ लावायला आले नाही किंवा भाडे दिले
नाही अशी लहान-सहान कारणे सांगून लग्न कार्यात न जाणारा मराठा समाज पदरचे पैसे
खर्च करीत मोर्चात सहभागी झाला. हा मानसिकतेत खुप मोठा बदल आहे. दुसरे म्हणजे
मराठा समाजाला चांगली शिस्त लागू शकते असा विश्वास निर्माण झाला आहे. आपली एकजूट
पुढारी वगळून होते असा विश्वासही मराठा समाजात निर्माण होत आहे. सामाजिक काही कुप्रथा
बदलण्याचा प्रयत्न भविष्यात होवू शकतो. हे मोर्चे मराठा समाजातील पोट जाती,
हलके-भारी, देशमुख-पाटील हे विभाजन दूर करण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहेत.
त्यामुळे विविध सत्तास्थानांमध्ये मराठा लोकप्रतिनिधींच्या संख्येत घसघशीत वाढ
होवू शकते.
जळगाव येथील मोर्चाबाबत
माझी काही व्यक्तीगत निरीक्षणे आहेत. ती सांगायला हवीत. मोर्चाच्या तयारीचे केंद्र
नुतन मराठा महाविद्यालयाची प्रशासकिय इमारत ठरली. तेथील बोस हॉलमध्ये दोन बैठका
झाल्या. तेथे बैठकांसाठी व्यासपिठ नव्हते. सर्वजण खाली बसून बोलत. हे कार्यालय ८ दिवस २४ तास सुरू होते. जळगाव जिल्हा
मराठा विद्या प्रसारक मंडळाचे संचालक मंडळ व प्रा. डी. डी. बच्छावसर यांचे
सुरुवाती पासून सहकार्य होते. “मराठा
मंगल” चे आर. बी. पाटील ८ दिवस १२ तास
कार्यालयात हजर होते.
मोर्चात लाखभर लोक येतील
ही पहिल्या टप्प्यात अपेक्षा नव्हती. म्हणजेच अपेक्षेपेक्षा जास्त लोक आले.
आयोजनाच्या बैठकांपासून लांब असलेले राजकारणी तिसऱ्या टप्प्यात सहभागी झाले.
मोर्चाच्या पॅटर्ननुसार शेवटपर्यंत आपापल्या जागी सर्व समुदायात मधल्या टप्प्यात
राहिले.
जळगावच्या मोर्चाचा खर्च
कोणी केला असा प्रश्न पडू शकतो. त्याचे उत्तर आहे की हा खर्च समाजाभिमुख कार्य
करणाऱ्या लहान-सहान कार्यकर्त्यांनी केला. त्यांनी श्रमदान केले व अर्थदान ही
केले. राजकारणी लोकांचीही काही प्रमाणात आर्थिक मदत कुठल्या न कुठल्या प्रकारे
झाली.
हया मोर्चात सहभागी
लोकांचा संयम किती प्रकारचा होता हेही लक्षात घ्यावे. लोक सकाळी घरून निघाले.
सायंकाळी पाचला जळगावहून परतले. तब्बल पाच-सहा तास लोक एकत्र होते. ना जेवणाची
इच्छा ना पाण्याची तहान. मोर्चातही लोक एकमेकांशी बोलत नव्हते. एक प्रकारे मौनातून
चिंतन सुरू असावे असेच वातावरण होते. मोर्चाच्या दिवशी वातावरण दमट होते. प्रचंड
उकाडा होता. आयोजकांनी केवळ पाणी देण्याची व्यवस्था केली होती. पण कुठे नाराजी
नाही की तक्रार नाही. हा मोर्चा मराठा कार्यकर्त्यांच्या निष्कलंक, निरपेक्ष आणि निष्काम गुणांमुळे यशस्वी झाला.
मराठा क्रांती मोर्चानंतर
पुढे काय ? हा प्रश्न सगळ्यांच्याच
मनांत आहे. त्यावर विचार करताना मला जाणवते की, समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी यातून दिशा मिळायला हवी.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिस्तीप्रमाणे मराठा क्रांती गावोगावी जोडली जावी.
गावागावात संस्कार केंद्रे व्हावीत. जिजाऊ, शिवाजी, संभाजी
यांचे चरित्र सांगितले जावे. मराठा युवा वर्गाला व्यसनांपासून परावृत्त करताना
त्यांना विज्ञान, तंत्रज्ञान याची कास
धरायला सांगावे. उद्योजक, व्यवसाय
या मार्गाला लावावे. लग्न पद्धतीत सुधारणेला प्रचंड वाव आहे. त्यासाठी आम्ही
"मराठा -मंगल" अभियानातून प्रयत्न करीत आहोतच. गरीबांच्या मुलांच्या
शिक्षणासाठी वसतीगृहे हवीत, मंगल
कार्यालये हवीत, असे अनेक विषय
टप्प्याटप्प्याने हाती घेवून नियोजन करता येईल.
या अदभुत ,अतिविराट मराठा क्रांती मोर्चानंतर मराठ्यांमधील
एकजूट वाढून सकारात्मक विचारांचे वादळ प्रत्येक मराठ्याच्या मनांत घोंघावत असणारच...
सगळे मिळून या विचारांना दिशा देण्यासाठी प्रयत्न करु या...
तुमचं माझ नात काय....
जय जिजाऊ , जय शिवराय
सामाजिक कार्यकर्ते,
कौन्सिलर व संघाचे स्वयंसेवक गिरीश कुलकर्णी नी मोर्तानंतर व्यक्त केलेल्या भावना
समस्त मराठा समाजाचे
अभिनंदन !
एक सामान्य नागरिक म्हणून
मी आज निघालेल्या मराठा क्रांति मोर्चाबद्दल माझे मत मांडू इच्छितो. मी वयाच्या
अठराव्या वर्षापासून सामाजिक जीवनात कार्य करीत आहे. त्यामुळे समाजातील एका
समस्येवर उत्तर शोधण्याचा प्रयत्न कौतुकास्पद व अभिनंदनीय आहे.
१ मी एका सामाजिक भीषण
समस्येवर समाजाची स्वाभाविक प्रतिक्रिया आज पाहिली.
२ पथ का अंतिम लक्ष्य नही
है सिंहासन चढ़ते जाना, सब समाजको लिए साथ में आगे है बढते जाना,
याचं वास्तव सादरीकरण...
३ संघटन मे शक्ति है !
याचे सजीव चित्र.
४ संवेदनशील माणसाचे
संवेदनशील विषयावरील उत्स्फूर्त प्रकटीकरण...
५ समस्त नागरीकांसाठी
आशेचा किरण... सज्जनशक्तीचे विधायक मार्गाने समस्या सोडविण्याचे दबावतंत्र...
६ गुन्हेगारांनाही जरब
बसविणारा मोर्चा...
७ मनातील व समाजातील
गैरवर्तन वा अपप्रव्रुत्तीला योग्य दिशेला घेऊन जाणारा मोर्चा...
८ आपले प्रश्न सामाजिक
पातळीवरुन समाजासमोर नेणे, त्यावर चर्चा घडवून आणणे व मार्ग शोधण्याचे आयुध...
मित्रांनो, मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संस्थेचा स्वयंसेवक
वा कार्यकर्ता ! मी संघाच्या अनेक मान्यवरांचे विचार ऐकले आहे. अनेक वेळेस
अधिकार्यांना प्रश्न विचारला जातो, संघांचं
काम किती वर्ष चालेल ? या प्रश्नाचे उत्तर मला
आजच्या मोर्चाने दिले. समाजातील समस्येला
समाजानेच उत्तर शोधली पाहिजे हा संघाचा आग्रह आहे. येथे एक विशिष्ट समाज एकत्रित
आला, संघाला समस्त हिंदू समाजाचे संघटन व्हावे असे वाटते एवढाच काय
तो फरक... संघाला अपेक्षित असलेली शिस्त ही येथे अनुभवास आली. आज खरोखर क्रांती
अनुभवली मात्र त्याचे परिणाम दिसण्यासाठी संयम व सातत्याची जोड ठेवावी लागेल व
त्यानंतरच ती खरी क्रांती ठरेल. तथास्तु...
तसेच घडो हिच छत्रपती शिवरायांच्याचरणी प्रार्थना !
हे संघाचे नाही माझे
वैयक्तिक मत आहे.



No comments:
Post a Comment