Friday, 30 September 2016

मराठा संघटन जाणार कोणत्या दिशेला ?


कोपर्डी येथील मुलीवर अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यातील मराठा समाज हा मराठा क्रांती मोर्चानंतर संघटन पातळीवर एकत्र आला आहे. पहिला मोर्चा औरंगाबादमध्ये निघाला. त्यानंतर बीड, आणि जळगाव येथेही मोर्चाचे आयोजन झाले. तेव्हा मोर्चातील गर्दी एक आकडी संख्येत होती. मात्र गेल्या काही दिवसात परभणी, लातुर, जालना, नगर, नाशिक, पुणे, धुळे या पाठोपाठ निघालेल्या सर्व मोर्चातील गर्दी ही प्रचंड, अति प्रचंड या शब्दांच्याही पलिकडे गेली आहे. मराठा संघटन मजबूत होत असून समाज म्हणून सर्वांची एका झेंड्याखाली येण्याची मानसिकता यातून दिसत आहे. वीस, तीस लाखांचे आकडे पार करीत आता मुंबईतील मोर्चा १ कोटींवर जाण्याची शक्यता आहे. हा सारा प्रकार जनआंदोलनांच्या व्याख्या बदलणारा असून मराठा क्रांती मोर्चाने सामाजिक आंदोलनांच्या परिभाषा, स्वरुप बदलून टाकले आहे. याचा एक मराठा म्हणून मला निश्चित आनंद व सार्थ अभिमान आहे. 

एकिकडे कोपर्डी घटनेचा निषेध करीत एका झेंड्याखाली एकत्र येणाऱ्या मराठा समाजाने आरक्षणाचा हक्क मागितला आहे. इतर कोणत्याही समाजाचे आरक्षण न हिसकावता किंवा त्यांच्या हक्काला बाधा न आणता मराठा समाजाला आरक्षणात हिस्सेदारी हवी आहे. ते कसे देता येईल ? या विषयावर केंद्र व राज्य सरकारने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची मागणी आहे, कोणतीही धमकावणी नाही, हे येथे इतरांनी लक्षात घ्यावे. या विषयी माझे स्पष्ट मत मांडताना मी म्हणेन की, आरक्षण हे सर्व जाती-पातींना आर्थिक निकषांवर दिले जावे. त्यातून जाती-पाती नष्ट होवून राजकारणाला नवी दिशा मिळेल. गुणवंतांच्या सोबत सर्वांना समान संधी मिळेल. तसे झाले तरच भारत महासत्ता होवू शकेल.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा हाच की, मराठा क्रांती मोर्चाचा प्रारंभ झाला तेव्हा कोपर्डीच्या घटनेचा निषेध करणे व मुलींच्या संरक्षणाच्या विषयाकडे जनता, सरकारचे लक्ष वेधणे ,यांबंधीचे कायदे अधिक कडक करणे हाच मुख्य हेतू होता. तो साध्य होणे सहज शक्य आहे. मात्र, कोपर्डीच्या घटनेकडे पहिल्या पासून दुर्लक्ष करणाऱ्या राज्य सरकारने अजुनही या प्रकरणी गंभीर भूमिका घेतलेली दिसत नाही. घटना व गुन्हा घडूनही गेल्या ३ महिन्यांत पोलिसांचे तपास पथक आरोपीवर चार्जशीट दाखल करु शकलेले नाही. जनमत किंवा जन आंदोलनाचा सरकारवर प्रभाव पडतो असे म्हणतात, मात्र महाराष्ट्रातील सध्याचे सरकार या बाबतीत उदासिन दिसत असून कोपर्डीच्या घटनेबाबत विद्यमान मुख्यमंत्री हे गृहमंत्री म्हणूनही निष्क्रिय दिसत आहेत, असे खेदाने व संतापाने म्हणावे लागत आहे. याचा जाब विद्यमान सरकारला आगामी निवडणुकांच्या प्रचारात द्यावा लागेल.

मराठा समाजाने आपल्या प्रमुख मागण्या मूक पध्दतीने मांडल्या आहेत. यात कोणताही आक्राळस्तपणा नाही. कोणताही आक्रमकपणा नाही. तरीही सरकारी यंत्रणा दखल घ्यायला तयार नाही. तसे पाहिले तर राज्यातील मोर्चात उपस्थितीचे अलिकडचे आकडे पाहता सरकारने ताबडतोब कृती करायला हवी. मराठा समाजाला मुंबईत मोर्चा काढण्याची वेळच यायला नको. या निमित्ताने सर्वच यंत्रणांवर पडणारा ताण सरकार टाळू शकते. तसे होणेही उचित राहील. पण पुन्हा मुद्दा हाच येतो की, विद्यमान केंद्र व राज्य सरकार मराठा क्रांती मोर्चा संदर्भात ठोस भूमिका घेताना दिसत नाही.

मराठा क्रांती मोर्चाचा आतापर्यंतचा प्रवास हा शिस्तबद्ध राहिला आहे. मात्र, त्यात हळूहळू काही अनिष्ट प्रवृत्ती शिरकाव करीत असल्याचेही दिसत आहे. हा प्रकार मोर्चाच्या तटबंदीला छेद देणारा आहे. त्याला वेळीच पायबंद घातला जाणे आवश्यक वाटते. मी हे एवढ्या स्पष्टपणे लिहतो आहे कारण, औरंगाबाद येथील मोर्चानंतर जेव्हा आम्ही जळगावात मोर्चा आयोजन करीत होतो तेव्हा अनेक गोष्टीचे शिस्त म्हणून पालन आम्ही केले आहे. त्यातील काही गोष्टी आता इतर ठिकाणी पाळल्या जात नसल्याचे माझे निरीक्षण असून मराठा क्रांती मोर्चा मुख्य हेतू पासून भरकटण्याची मला शक्यता दिसते.

अगदी उदाहरण द्यायचे तर मोर्चा संदर्भातील मागण्यांचे आहे. कोपर्डीच्या घटनेची चौकशी, गुन्हेगारांना शासन या मुख्य मागणीसह मराठ्यांना आरक्षण हवे व ऍट्रोसीटीत संशोधन असे विषय होते. मात्र, आता काही ठिकाणी ऍट्रोसीटी रद्द करा असा विषय या मोर्चातून मांडला जात आहे. ऍट्रोसीटी रद्द करा ही मागणी नाही, त्यात योग्य ते संशोधन करा हेच अगोदर पासून म्हणणे आहे. माझ्या मते ऍट्रोसीटीचे संरक्षण सर्वच समाजाला द्यायला हवे. वाईट वागणूक किंवा जातीवाचक शिविगाळ ही कोणालाही झाली तरी गुन्हा दाखल व्हायला हवा. किंवा खोटी ऍट्रोसीटी दाखल करणाऱ्यांना  कायमसवरुपी मागास घटकाच्या सर्व सवलती बंद केल्या जाव्यात.

अजून एक गंभीर व चुकीचा प्रकार घडतोय. तो म्हणजे मराठा समाजातील काही मंडळी पेपर, चैनल आदी माध्यमांच्या संपादकांना फोन करुन त्यांच्याशी मोर्चाच्या वृत्तांकना बाबत वाद घालत आहेत. हा प्रकार चुकीचा आहे. महाराष्ट्रातील सर्वच माध्यमे मराठा मोर्चाच्या बातम्या, फोटो देत आहेत. त्यात कमीअधिक होवू शकते. पण त्याचा अर्थ असा नाही की, तेथील संपादकांना शिवराळ भाषेत बोलले पाहिजे. एकदा मोर्चे आटोपले की, समाजाचे इतर काम पुढे वाढविण्यासाठी माध्यमांची गरज पडणार आहे. म्हणून आता मुखात व मेंदूत संयम हा हवाच.

अशा प्रकारच्या संयमाचा माझा आग्रह असला तरी शिवसेनेच्या मुखपत्र सामनातून व्यंगचित्राचा खोडसाळपणा हा सहन  करण्याच्या पलिकडे आहे. शिवसेना हा पक्ष मराठी आणि मराठा माणसांचा आहे. शिवसेनेचा झेंडा आजही मराठा, बहुजनांच्या खांद्यावर आहे. हे माहित असताना व्यंगचित्राच्या माध्यमातून झालेल्या चुकीबद्दल सामनाचे संपादक यांनी जाहीर माफी मागायला हवी होती. मात्र, संजय राऊत नावाच्या व्यक्तीने पुन्हा आडवे तिडवे बोलून मराठा समाजाला दुखावले आहे. याची जबर किंमत शिवसेनेला आगामी काळात मोजावी लागु शकेल, हेही तेवढेच खरे.

मुंबईतील मोर्चा निमित्त मराठा कार्यकर्त्यांना मोफत रेल्वे प्रवास करा असेही आवाहन सोशल मीडियातून केल्याचे घडले आहे. अशा प्रकारे कोणताही निर्णय मोर्चाच्या आयोजकांनी जाहीर केलेला नाही. होवू शकते असा संदेश इतर लोकांनी मराठा समाजाला बदनाम करायला टाकला असेल. तसे असले तरी मराठा कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढली आहे. मुंबईला रेल्वेने जाताना तिकीट काढूनच जावे हे त्यांच्यावर नैतिक बंधन आहे. ज्यांना मोर्चाला यायचे आहे मात्र खर्च करणे शक्य नाही, त्यांचा प्रवास व इतर खर्च इतरांनी करायला हवा. पण कोणत्याही स्थितीत फुकट प्रवास करणे मराठा कार्यकर्त्यांनी टाळावे.

मराठा क्रांती मोर्चा आयोजनाच्या निमित्त काही ठिकाणी बड्या पुढाऱ्यांनी देणग्या घोषीत केल्याचे वृत्त आहे. मला यानिमित्त असे सांगायचे आहे की, अशा देणग्या या केवळ मोर्चा पुरत्या जाहीर केल्या आहेत. त्याचा गाजावाजा करण्याची गरज नाही. मोर्चा आयोजनासाठी लागणारे साहित्य व इतर सेवांवर होणारा खर्च हा काही जणांना विभागून दिला आहे. त्यासाठी रकमेचे बंधन नाही. पण काही अती उत्साही मंडळी आपल्या देणग्यांचा गवगवा करून मराठा समाज मोर्चा निमित्त पैसा गोळा करीत असल्याचा अपप्रचार करण्याची संधी देत आहेत. माझे या विषयावर स्पष्ट मत असे  आहे की, जर खरोखर लाखो, कोट्यवधी रुपयांच्या देणग्या गोळा होत असतील तर त्या विधायक व कायदेशीर पद्धतीने गोळा करा. मुली-मुलांच्या शिक्षण, निवास, शिष्यवृत्ती, लग्नकार्यालये अशा सुविधांवर खर्च केला जावा.

गेल्या काही दिवसांपासून मलाही प्रश्न पडला आहे की, मराठा क्रांती मोर्चांचे यशाचे पर्व संपल्यानंतर पुढे काय ? याचे उत्तर आतापासून शोधायला हवे. बैल गेला आणि झोपा केला, असे व्हायला नको. मराठा क्रांती मोर्चा हे मराठा संघटनाचे माध्यम असले तरी त्यातून मराठा समाजाच्या उत्थान व प्रगतीचा मार्ग सापडायला हवा. किंबहुना  तो शोधायला हवा. नाहीतर मराठा संघटन पुन्हा भरकटले जावून राजकिय पक्षांच्या गणितासाठी वापरले जावू शकते. भविष्यात हिच जास्त भीती आहे. मराठा समाजातील जे  प्रस्थापित आहेत त्यांनी विसथापितांची सरवतोपरी मदत करायला हवी...

मराठा क्रांती मोर्चाचा प्रवास आता निर्णायक वळणावर आहे. या आंदोलनाने अनेक विक्रम स्थापित केले. परंतु या आंदोलनाला यशाचा कळस चढवायचा असेल तर पुढे काय ? या विषयावरही आताच मंथन होणे आवश्यक आहे. हे मंथन अनुकूल व प्रतिकूल अशा दोन्ही भूमिकांमधून केले जाणे अभिप्रेत आहे.

समाजातील सर्व विचारवंत, उच्च शिक्षीत, अभ्यासू व राजकारण्यापासून अलिप्त अशा मंडळींचे गावोगावी विचारपीठ तयार व्हावेत व या मोर्चांचे फलित म्हणून मराठा समाजात मोठी क्रांती घडावी हीच छत्रपती शिवरायांच्या चरणी प्रार्थना....
जय जिजाऊ , जय शिवराय !!!                   

No comments:

Post a Comment