विश्वप्रभा
हॉस्पिटलच्या प्रवासाला आज (दि. ३ डिसेंबर २०१६) १७ वर्षे पूर्ण झाली. हॉस्पिटलचा
प्रवास १८ व्या वर्षांत सुरू झाला. माझ्या व डॉ. सिमाच्या वैद्यकिय सेवेचा प्रवासही १९ व्या
वर्षाकडे निघाला आहे. विश्वप्रभा सुरू करण्यापूर्वी मी सिव्हील हॉस्पिटल व
स्वातंत्र्य चौकातील डॉ. दिलीप चव्हाण यांच्या जागेत जवळपास वर्षभर वैद्यकिय सेवा
दिली होती. आतापर्यंतचा हा प्रवास माझ्यासाठी एक आनंदयात्राच आहे.
विश्वप्रभा
हॉस्पिटल हे महिला आणि शिशुंच्या सेवेत दि. ३ डिसेंबर १९९९ पासून रुजू झाले. मी नवजात बालरोग तज्ञ आणि डॉ. सिमा ही प्रसुतीतज्ञ असे आमचे कॉम्बिनेशन आहे. असे खूप कमी असते. विश्वप्रभा हॉस्पिटलमुळे गरोदर माता आणि प्रसुतीनंतर बाळाच्या आरोग्याची चिंता असे प्रश्न मिटले. माता आणि बाळ सुखरुप राहिल हा विश्वास लोकांच्या मनात निर्माण झाला. तो आजपर्यंंत कायम आहे. त्या काळात जळगाव शहरात बालरोगतज्ञ
डॉक्टरांची संख्या जवळपास बारा होती. मी तेरावा होतो. जळगाव शहरातील सर्व
बालरोगतज्ञांना एकत्र आणून त्यांचे संघटन
करण्यासाठी मी सुरुवातीला प्रयत्न केले. आतापर्यंतच्या प्रवासात डॉक्टरांच्या
इतरही संघटनांमध्ये व विविध सेवाभावी उपक्रमात सहभाग घेत मी माझ्या
हॉस्पिटलमध्येही नागरिकांना सेवा देत आलो.
खासगी सेवेबाबतही
मी थोडा वेगळा होतो. स्वत:चया व्यवसाय वाढीसाठी मी खुप काही प्रयत्न कधी केले
नाही. माझ्याकडे आलेल्या पेशंटला चांगली वागणूक देत आणि खात्रिशीर उपचार करीत
राहिलो... त्यामुळे पेशंट व त्याच्या नातेवाईकांच्या मौखिक प्रचार-प्रसारातून माझी
सेवा वाढली आणि विस्तारली. डॉ. सिमाच्या संदर्भात मी कौतुकाने म्हणून शकतो की, ती प्रसुतीला येणाऱ्या महिलांच्या संदर्भात माझ्यापेक्षा जास्त सजग असते. आजाराच्या निदानाबाबतही ती कमालीची दक्ष असते. तिचा स्वभाव माझ्यापेक्षा स्पष्टवक्ता आहे. उलट मी थोडा फार भीडस्त आहे. डॉ. सिमा स्पष्ट बोलते त्यामुळे रुग्ण व तीचे नातेवाईक ही तिचे ऐकतात. गरोदर मातांना त्याचा लाक्ष होते. कुटुंब सुद्धा सावध होते. ही बाब आमच्या वैद्यकिय सेवेला पूरक ठरली आहे. १७ वर्षांच्या प्रवासाचा विचार करताना मी व डॉ. सिमा आनंदी
आहे. कारण, माझ्या हातून व
हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांच्या सहकाऱ्याने आम्ही शेकडो बालकांना योग्य त्या आरोग्य
सुविधा देवू शकलो. आमच्या टीमवर्कच्या माध्यमातून अनेकांना जीवनदान मिळाले.
त्यांच्या पालकांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि आमचे नाव, सेवा विस्तारली. वैद्यकिय सेवेत कोणतेही काम
१०० टक्के यशस्वी नसते. काही अपवादही असतील. त्याबद्दल मी कोणालाही दोष लावत नाही.
पण ज्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत त्यांच्यांविषयी खेद आहे आणि आम्ही
दिलगिरही आहोत.
मी वैद्यकिय
सेवेत यावे आणि समाजाला उत्तम सेवा द्यावी ही माझे वडील विश्वासराव आणि आई प्रतिभा
यांची ईच्छा होती. त्यांनी दिलेला वसा घेवून मी व डॉ. सिमा आजही काम करतो आहे. पेशंट म्हणून
येणारी बालके आणि त्यांचे पालक यांना शक्य ती उत्तम सेवा देण्याचा माझा प्रयत्न
असतो. पैसा कमावण्यासाठी मी या व्यवसायात नाही. माझ्यातल्या समाजिक जाणीवा मी
जागृत ठेवल्या आहे. म्हणूनच गरजूंना मी स्वतःच बिलात योग्य ती सवलत देतो. खरेतर
आपली सामाजिक व्यवस्था तशी उलटीच आहे. जो गरीब आहे, तो शंभर
रुपयांसाठी प्रामाणिकपणे वेटींगवर असतो आणि जो आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे तो
डॉक्टरांकडून सवलत मागतो. मला या प्रकाराविषयी नक्कीच खंत आहे.
या १७ वर्षांत
मला पेशंटांचे अनेक चांगले अनुभव आले. काही वेगळेही अनुभव आहेत. पण मी असे समजतो
की, त्यातून काही गोष्टी मी शिकलो. सामाजिक
क्षेत्रात गरजूंना मदत दिली जावी व तशी व्यवस्थाही हवी. आम्ही रोटरीतून तसे
प्रयत्न करतो. आमच्या १७ वर्षांच्या प्रवासात डॉ. सिमाने मला खंबीरपणे आणि बरोबरीने साथ दिली आहे. खरे तर माझ्या खांद्याला खांदा लावून विश्वप्रभा हॉस्पिटलची सेवा सांभाळली आहे. पत्नीपेक्षा सहकारी म्हणून मला तीचा आदर आहे.
आजही वैद्यकिय
यंत्रणा किंवा व्यवस्था १०० टक्के परिपूर्ण नाही. त्यात अजूनही अनेक गोष्टी
अनाकलनीय आहे. विज्ञान व संशोधनातली त्याची उत्तरे सापडत नाहीत. आज जे वैद्यकिय
ज्ञान दिसते ते केवळ हिमनगाचे टोक आहे. अजून वैद्यकिय सेवेचा विस्तार खुपसारा
व्हायचा आहे. अशा प्रवासात वैद्यकिय सेवा देणाऱ्यांना सतत अपडेट राहणे गरजेचे आहे.
विश्वप्रभा हॉस्पिटलच्या
माध्यमातून आम्ही सतत नव्या तंत्र-यंत्राचा स्वीकार केला आहे. जळगाव शहरातील
सर्वांत पहिले आधुनिक नवजात शिशू अतिदक्षता केंद्र "किडीकेअर" आम्ही दि.
१८ ऑगस्ट २००४ ला सुरू केले. त्यात नवजात बालकांना व कमी दिवसांच्या अर्भकांना
पुरेपूर आरोग्य सेवा देण्याची सुविधा होती व आहे. अशा प्रकारचे पहिले केंद्र आम्ही
सुरू केले. त्यात अर्भकांना कृत्रिम श्वास देण्याची व्यवस्था आहे. सुरुवातीची काही
वर्ष या प्रकल्पात डॉ. राजेश शिंपी व डॉ. संजीव चौधरी हे आमच्या सोबत होते...
त्यानंतर नवजात शिशुंसाठी स्वतंत्र रुग्णवाहिका सुद्धा आम्ही सुरू केली. त्यात
बालकाला नेण्याची पेटी, ऑक्सिजन सिलींडर
आदी सुविधा आहेत. ही रुग्णवाहिका म्हणजे चालते फिरते रुग्णालयच आहे. या
रुग्णावाहिकेचा वापर बऱ्हाणपूर, बुलढाणा, भुसावळ, धुळे, पारोळा, चोपडा आदी
ठिकाणच्या रुग्णांनी केला व आताही करीत असतात. विश्वप्रभा हॉस्पिटलमध्ये नवजात
बालकांच्या आरोग्यविषयक सर्व सुविधा उत्तम प्रकारे दिल्या जातात. या प्रवासात माझे
सोबत डॉ. माजीद खान व डॉ. मंदार काळे हेही सहभागी आहेत.
१७ वर्षांच्या
प्रवासात मी आनंदी आहे पण समाधानी नाही. लोकांच्या आरोग्य विषयक सर्व गरजा एकाच
छताखाली देता येतील का, या दृष्टीने एक
मेगा प्रकल्प करण्याचा माझा विचार आहे. सध्या मल्टी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे युग
आहे. तसा एखादा प्रकल्प करण्याचा विचार आहे. काही समविचारी मित्र तथा सहकारी
शोधतोय. नव्या प्रकल्पात डॉ. सिमाची साथ तेवढीच महत्त्वाची असेल. प्रकल्प सर्व सामान्यांसाठी असावा तसेच तेथे सर्वोत्तम सेवा असावी हाच
माझा उद्देश राहणार आहे.
माणसाचा
पुनर्जन्म असतो की नाही मला माहित नाही. पण मला आता जे काम करायला संधी मिळाली आहे, तेच काम जनमोजनमी करायला मिळावे हीच माझी
अपेक्षा आहे. गेल्या १७
वर्षांत कमी दिवसांची किंवा कमी वजनाची अनेक बालके आमच्या हॉस्पिटममधून बचावली.
त्यातील एक कन्या आता १७ वर्षांची आहे. तीचे पालक अधूनमधून भेटतात. इतरही अनेक
मुले आज मोठी झाली आहेत. त्याच्याकडे पाहून मी या वैद्यकिय व्यवसायात असल्याचा मला
आनंद होतो.... माझी ही आनंदयात्रा अशीच सुरू राहावी यासाठी मी सदैव प्रयत्नशील
असणार आहे. माझ्या या आनंदयात्रेत मित्र मंडळी, रोटरी परिवार, आमचा असंख्य नातेसंबंधांचा गोतावळ, आप्त स्वकियांचा सहवासही आनंद देणारा आहे. म्हणूनच ही आनंदयात्रा सुखकर होत आहे.


No comments:
Post a Comment