Wednesday, 19 October 2016

रोटरीचा कृत्रिम हाताचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प



रोटरी क्लब ही जगभरातील गरजू समाजासाठी विविध प्रकारचे कार्य करणारी संस्था आहे. रोटरीचे प्रकल्प हे समाजात सध्या कोणत्या प्रकारचे सहाय्य हवे याचा विचार करुन राबविले जातात. त्यामुळे अशा प्रकल्पातून गरजुंसाठी थेट लाभाच्या अनेक योजना राबविल्या जावून त्या उपयुक्त ठरतात. यावर्षी रोटरी इंटर नॅशनलने मानवतेच्या सेवेत रोटरी अर्थात 'Rotary serving humanity ' हे ब्रीद घेतले आहे. जगभरातील सामान्य लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी कार्य करता येईल, याचा विचार करुन काही उपक्रमांची आखणी केली आहे. त्यातील एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हा गरजुंना (दिव्यांगांना) कृत्रिम हात पुरविण्याचा आहे. त्या अंतर्गत रोटरी क्लब जळगाव वेस्टने पहिले शिबिर यशस्वीपणे पार पाडले.

 रोटरी डिस्ट्रिक्ट ३०४० माजी प्रांतपाल अतुल गार्गव हे  दि. १७ जुलैला रोटरी क्लब जळगाव वेस्टच्या पदग्रहण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. त्यांनी भाषणात कृत्रिम हात प्रकल्पाचा उल्लेख करुन इंदूर येथील रोटरी अपटाऊन क्लबने हा प्रकल्प पहिलांदा राबविल्याचे सांगितले.  हा संदर्भ माझ्या लक्षात होता. त्यावेळेस मी सुद्धा रोटरी डिस्ट्रीक्ट ३०३० चा उपप्रांतपाल म्हणून हजर होतो.  जळगामधील एका दैनिकाने जळगावातील ६ रोटरी क्लबच्या नुतन पदाधिकारी तसेच उपप्रांतपाल यांना रोटरीच्या उपक्रमांची वर्षभरातील उपक्रमांची तयारी या विषयावर चर्चेसाठी बोलावले होते. तेव्हा गार्गव यांच्याशी मी संपर्क केला. हा प्रकल्प जळगावला करु शकू का ? अशी विचारणा केली. त्यांनी होकार दिला. तेव्हा त्या चर्चेच्या कार्यक्रमात मी कृत्रिम हात वाटप प्रकल्पाची घोषणा केली होती. नंतर त्याचा आम्ही पाठपुरावा केला.

रोटरी इंटर नॅशनलच्या सहकार्याने इंदूर येथील रोटरी क्लब अपटाऊनने या उपक्रमाचे प्रायोजकत्व घेतले आहे. सर्व प्रथम तेथे या उपक्रमांतर्गत शिबिर झाले. समाजातील बऱ्याच महिला, पुरुषांचा व मुलांचा हाताच्या धोट्यापासून मनगटाचा भाग तुटलेला किंवा अपघातात गमावलेला असतो. अशा लोकांना हा कृत्रिम हात वरदान आहे. या कृत्रिम हातासाठी उच्च पातळीचा धातू आणि अत्यंत लवचिक फायबर वापरुन त्याची पकड तयार केलेली असते. हे फायबर हवे तसे वाकवता, दाबता येते. शिवास मनगटाजवळची पकड हवी तशी वळवता येते. त्यामुळे संबंधितांना हा हात लावल्यानंतर घरकाम, लेखन, सफाई, वस्तू वाहून नेणे, उचलणे, वाहन चालविणे अशी कामे सहज करता येतात. 

अशा प्रकारचा कृत्रिम हात अमेरिकेतील एलएन फोर (LN 4) ही कंपनी तयार करते. एका हाताची किंमत जवळपास अकराशे डॉलर असावी. हा हात लावण्यासाठी गरजू कसे हवेत याचे तीन मुख्य निकष आहेत. एकतर त्या व्यक्तिच्या धोट्या खाली किमान तीन ते चार इंचाचे मनगट हवे. त्याच्या सध्याच्या हाताचा कमरेपर्यंत चा फोटो हवा, पत्ता व संपर्क क्रमांक हवा. एवढ्या तीन गोष्टींची पूर्तता झाली की त्या व्यक्तीची माहिती इंदूरला व्हाटस ऍपवर फोटोसह दिली जात असे संबंधितास हात लावता येईल किंवा नाही याची तेथून लगेच माहिती मिळते. त्यानंतर सर्व व्यक्तींना एके दिवशी शिबिरात कृत्रिम हात प्रदान केले जातात. या हातांचा खर्च रोटरीचे इंटर्नशनल करतात. जेथे कृत्रिम हात प्रदान शिबिर होते तेथील रोटरी क्लबसंबंधित व्यक्ती व त्यांच्या थांबण्याचा, भोजनाचा खर्च करतात.

जळगाव येथे रोटरी वेस्टच्या पुढाकाराने गेल्या दि.१६ ऑक्टोबरला मायादेवी नगरातील रोटरी भवनात दिव्यांगांना कृत्रिम हात लावण्याचे शिबिर झाले. या शिबिरात १३० दिव्यांगांची नोंदणी झाली होती. त्यात १०४ जणांची हात लावण्यासाठी निवड केली होती. प्रत्यक्ष तज्ञांनी पाहणी व तपासणी करुन ८२ गरजुंना कृत्रिम हात लावले. या उपक्रमास रोटरी क्लब ऑफ इंदूर अपटाऊन आणि इनरव्हिल क्लब ऑफ जळगाव यांचे सहकार्य साभले. इंदूरच्या विजयंत स्काऊट ग्रुपनेही मदत केली.

या कार्यक्रमास रोटरी डिस्ट्र्रीक्ट ३०३० चे प्रांतपाल महेश मोकाळकर, महापौर नितीन लढ्ढा, आमदार सुरेश भोळे, उपप्रांतपाल डॉ. राजेश पाटील, रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टचे अध्यक्ष योगेश भोळे, सचिव संजय इंगळे, प्रकल्प प्रमुख डॉ. पंकज कोचर, सहप्रकल्पप्रमुख डॉ. भुषण झंवर, डॉ. सुशिलकुमार राणे, माजी प्रांतपाल अतुल गार्गव आदी उपस्थित होते. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे इंदूर रोटरी क्लबचे तरूण मिश्रा हे १७ जणांसह उपस्थित होते. यात संजीव गुप्ता, सुनील माहेश्वरी, राजेश अवस्थी, इनरव्हिल क्लबच्या मनिषा गार्गव, अर्चना गुप्ता, जयश्री मिश्रा, रूपा माहेश्वरी, अल्पना अवस्थी यांचा समावेश होता. रोटरीच्या या उपक्रमास के. के. कॅन्सचे संचालक व आमच्या क्लब चे आदर्श कोठारी, यांनी सगळ्यांसाठी भोजन व्यवस्था करून सहकार्य केले. शिवाय, स्वयंसेवक म्हणून जळगावमधील काही तरुणांनी व रोटरी सदस्यांच्या पाल्यांनी शिबिरस्थळी सेवा दिली.

राज्यात रोटरी तर्फे यापूर्वी दिव्यांग बांधवांना जयपूर फूटचे मोफत वाटप केले जात होते. आजही केले जाते. एलएन फोर टाईपचा कृत्रिम हात देण्याचा हा प्रकल्प पहिलांदाच राबविला गेला. या उपक्रमाचे पुढील उत्तरदायित्व आता रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टने घेतले आहे. या उपक्रमात ६ वर्षांच्या चिमुकलीपासून ६० वर्षांच्या वृध्दापर्यंत ८२ जणांना कृत्रिम हात लावण्यात आले. काही जणांना सुधारित पद्धतीचे हात नंतर दिले जातील. काहींवर शस्त्रक्रिया करुन नंतर हात लावले जातील असे सांगण्यात आले.

या शिबिराच्या ठिकाणी अनेक मान्यवर रोटरीयन शक्य ते कार्य करीत होते. दिव्यांगांची ऑनलाईन नोंदणी करणे, त्यांच्याकडून अर्ज भरून घेणे, तपासणी करणे, कृत्रिम हात बसविणे, हात कसा वापरावा याचे प्रशिक्षण देणे, त्याला मार्गदर्शन करणे याचे योग्य नियोजन करण्यात आलेले होते. या उपक्रमाची माहिती पोहचू न शकल्याने वंचित राहिलेल्या दिव्यांग बांधवांनी रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टच्या कोणत्याही पदाधिकारी किंवा सदस्यासोबत संपर्क केल्यास त्यांना पुढील शिबिरात मदत केली जाणार आहे.

जळगाव येथील शिबिरात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातून बारामती,पनवेल इंदापूर,नागपूर, नाशिक, जालना, मालेगाव येथून गरजू आले होते. शहादा येथील डॉ. लक्ष्मण सोनार व संकल्प ग्रुप यांनी १७ गरजुंना स्वखर्चाने जळगावला आणले होते. त्यांना कृत्रिम हात लावण्यात आले.

काही लाभर्थींच्या प्रतिक्रिया

या शिबिरात ज्या गरजुंना कृत्रिम हात लावण्यात आले त्यांनी उत्स्पूर्तपणे प्रतिक्रिया दिल्या. अनेकांच्या डोळ्यांत समाधानाचे व आनंदाचे अश्रू आले. कार्यक्रमाचे आयोजन केल्या बद्दल रोटेरियनला सुद्धा समाधान मिळाले.

परिवाराला आधार

जयाजी साहेबराव मगर (वय ४८)  - जालना तालुक्यातील सिंदी काळेगाव या छोट्याशा गावातील मी रहिवासी आहे. लहानपनापासून जेमतेम परिस्थित परिवारासह शेती करतोय. १९८३ मध्ये शेतीकाम करताना थ्रेशर मशीनमध्ये हात गमावला. परिस्थिती आणि अज्ञानामुळे आजवर नवीन हात बसविण्याचे शक्यच झाले नाही. गेल्या काही वर्षांपासून जालन्याच्या बसस्थानकावर सायकल स्टॅण्डवर वॉचमन म्हणून काम करतो आहे. यासेबत अर्धे बिघे शेती करतो. आमच्या येथील एक इंजिनीयर देशमुख साहेबांनी माझे फोटो काढले. मोबाईलवर डा राजेश पाटील यांना पाठविले आणि मला रोटरी क्लबच्या उपक्रमाबाबत माहिती दिली. रविवारी मध्यरात्री १२ वाजता जळगावात आलो. रात्र बसस्थानकात काढल्यानंतर पहाटेच साडेसात वाजता रोटरी भवनात आलो. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर अवघ्या २० मिनीटात कृत्रिम हात बसवून मिळाला. कृत्रिम हाताच्या सहाय्याने अनेक कामे करता येणार असून उत्पन्न वाढून परिवारालाही हातभार लावता येणार आहे.

जगण्याची दिशा मिळाली

तुळशीदास करणे (सोलापूर, वय ५५) - मॅकेनिक म्हणून काम करीत असताना १९९८ मध्ये ट्रकने उडविले. अपघातात मी वाचलो. परंतु, उजवा हात कायमचा गमवावा लागला. घरीची आर्थिक परिस्थिती नसल्याने तेव्हा योग्य उपचार मिळू शकले नाहीत. त्यानंतर कृत्रिम हात बसविण्याची माहिती घेतली. परंतु, तो राजस्थानमध्ये बसवून मिळतो आणि अफाट पैसे लागतात, असे समजल्यावर ती आशा देखील मावळली. एक हात नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागता होता. आज मुलगा जरी कमवता असला तरी फारसे उत्पन्न नसल्याने हे असले आयुष्य नकोसे झाले होते. केव्हा मरण येईल याचीच वाट पाहत बसलो होतो. गेल्या महिन्यात रोटरीचे अनुप आसावा साहेबांनी त्यांच्या सासरवाडीला या उपक्रमाची माहिती दिली. त्यांच्या सासरच्या मंडळींनी तात्काळ मला याबाबत कळविले आणि जळगाव ये-जा करण्यासाठी भाड्याचीही व्यवस्था करून दिली. रविवारी पहाटे जळगावात आलो. आज रोटरी वेस्टच्या सहकार्याने मला जगण्याची नवीन दिशा मिळाली असून मृत्यूचा विचार मी मनातून दूर सारला.

मी खूप शिकणार

अतकरे दाम्पत्य (नागपूर) आमच्या ११ वर्षे वयाच्या आयुषीचा हात जन्मापासूनच अपंग होता. तिला पूर्ण कृत्रिम हात मिळावा यासाठी अनेक ठिकाणी प्रयत्न केले. परंतु, वय कमी असल्याचे कारण देत अनेकांनी नकार दिला. त्यातच काही दिवसांपूर्वी जळगावात रोटरी क्लब ऑफ वेस्टतर्फे पहिल्यांदाच कृत्रिम हात बसविण्याचा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे समजल्याने आम्ही आयुषीला जळगावी घेवून आलो. याठिकाणी असलेले नियोजन आणि व्यवस्था अतिशय सुरेख होती. आमच्या चिमुकलीला कृत्रिम हात बसवून मिळाल्याने आम्हाला अतिशय आनंद झाला आहे. (नवीन हातामुळे मी आता खूप काही करू शकणार असून माझी शक्ती वाढली आहे. शाळेत जावून खूप अभ्यास करेल, खूप शिकून मोठी भरारी घेईल असे आयुषी म्हणाली.)

रोटरीच्या या उपक्रमास जळगाव येथील सहकारी गनी मेमन, संदीप काबरा, रमन जाजू, अरूण नंदर्षी, शशांक मत्री, राहूल राणे, दिग्विजय पाटील, विनय बेंडाळे, तुषार चित्ते, रिंकल कोठारी, निखील बियाणी, अनुप आसावा, अक्षय ढाके, मयांक शहा, विनोद बियाणी, सुनील अग्रवाल, डॉ.मिलींद जोशी, आदर्श कोठारी, अरूण बोरोले, हकीम बुटवाला, राजेंद्र महाजन, सागर पाटील, शालीग्राम मराठे, बिपीन काबरा, प्रविण जाधव, विवेक काबरा, सुप्रीत दीक्षित, अशोक चुगवाणी, सुनील सुखवानी, कुमार वाणी, भुषण झंवर, शिरीष भंगाळे, पंकज राऊत, आकाश कांकरीया, जळगाव इनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा कंचन कांकरीया, सरोज इंगळे, आबेदा काझी, हेमा बियाणी, संध्या महाजन, राजश्री पगारीया, प्राजक्ता वैद्य, इंदूरच्या विजयंत स्काऊट ग्रुपचे मुकेश खंडेलवाल, कांतीलाल जैन, विनोद बाफना, सुनील बिजंगे, कमलकिशोर सोनी, मितेश सिंगी आदींनी सहकार्य केले.

No comments:

Post a Comment