Friday, 22 April 2016

लहान मुलांसह मातांना उन्हाळ्यात लग्न कार्यात बंदी हवी....

 

नमस्कार मित्रांनो

लहान मुलांच्या वैद्यकिय सेवेचा गेल्या अनेक वर्षांचा माझा अनुभव डोळ्यांसमोर ठेवून मी आज थोडा वेगळा आणि बंडखोर मुद्दा चर्चेत मांडणार आहे. सध्या एप्रिल महिना मध्यावर आहे. तापमान ४५ अंशापर्यंत आले आहे, अजून मे महिना जायचा आहे. आमच्या विशवप्रभा हास्पिटलमध्ये उन्हाळ्याच्या प्रांरभापासून नवजात शिशुंसह पाचवर्षे वयोगटातील अनेक लहान मुले उष्माघाताच्या आजारावर उपचारासाठी दाखल होतात. याशिवाय, उन्हाळ्यातील विषमज्वर, अतिसार, काविळीचे बालरुग्णही मोठ्या संख्येत दाखल होतात. गोवर, कांजण्यांचेही रुग्ण असतात. अशावेळी बालरुग्णांवर अत्यंत काळजीपूर्वक उपचार करावे लागतात. बऱ्याचवेळा पालकांच्या थोड्या दुर्लक्षामुळे आजार बळावतात. हातात असलेली स्थिती हाताबाहेर जाते.
गेल्या अनेक वर्षांपासून मी लहान मुलांच्या आजारपणासंदर्भात अभ्यास करीत आहे. माझ्याकडे रुटीन चेकअपसाठी अनेक माता बालकांना नेहमी आणतात. तेव्हा मी त्यांना लहान मुलांच्या आजाराची काळजी कशी घ्यावी याविषयी सतत सूचना करीत असतो. मुलांच्या प्रकृतीसाठी काय करावे आणि काय करु नये ? हे मी त्यांना सांगत असतो. त्यात उन्हाळ्यात घ्यावयाच्या काळजीविषयी विशेष सूचना देतो. मात्र, मला असेही लक्षात येत आहे की, मातांसह पालकही त्याकडे दुर्लक्ष करतात.

नवजात शिशू आणि पाचवर्षे वयोगटातील बालकांसाठी उन्हाळ्याचा काळ अत्यंत धोकादायक असतो. मात्र याच काळात लग्नसराई आणि गुढीपाडवा, आखाजी असे माहेरी जाण्याचे सण, उत्सव असतात. यात सहभागी होण्याचा मातांमध्ये उत्साह असतो. मुलाबाळांनाही सुट्या असतात. त्यांना घेवून लांबच लांब प्रवास हा बस, खासगी वाहानाद्वारे केला जातो. वेळा तीव्र उन्हाच्या असतात. शरीरातून पाण्याचे उत्सर्जन मोठ्याप्रमाणात सुरू असते. मोठी माणसे रस, ज्यूस, लस्सी, ताक वगैरे पिवून आपली तहान भागवतात. त्यांच्या शरीरातील पाणी टीकून राहते. पण लहान मुलांना पाणी मागता येत नाही. त्यांच्या शरीरातील पाणी कमी होत जाते. लघवी कमी होवून नंतर ती थांबून जाते. अशा दुर्लक्षित अवस्थेत माता, पालक मुलांना सण-उत्सवासाठी घेवून फिरतात. त्यातून उष्माघात किंवा इतर आजार बळावतात. उन्हाळ्यात वातावरण शुष्क असते. विविध आजारांचे विषाणू झपाट्याने वाढतात, त्यांचा प्रादुर्भाव वाढतो.

लहान मुलांचे अंग लवकर गरम होते. त्यालाच आपण ताप आला असे म्हणतो. अशावेळी लगीनघाईत अडकलेली मंडळी बालकांना तापनाशक जुजबी औषधे देवून वेळ भागवतात. जवळ उपलब्ध असेल त्या डॉक्टरकडून उपचार करुन घेतात. तापनाशक किंवा वेदनानाशक अनावश्यक किंवा जादा प्रमाणातील औषधी बालकांच्या थेट किडनीवर परिणाम करतात किंवा किडनी निकामी करतात. अशा वातावरणात बालकाची तब्बेत जास्त बिघडली की, बालरोगतज्ञाकडे आणले जाते. आम्ही शक्य ते चांगले आणि सत्वर उपचार करीत असतो. पण आजाराच्या पहिल्याच पायरीवर त्याची लक्षणे ओळखून उपचार झाले नाही की, इतर सर्व गोष्टी हाताबाहेर जाण्याचा धोका असतो.

उपचार करणयापेक्षा आजार टाळणे हे कधीही इष्ट (...prevention is better than cure) हा अनुभव लक्षात घेवून उन्हाळ्यात शिशू ते पाचवर्षे वयोगटातील मुले आणि त्यांच्या मातांसाठी मी थोडी टोकाची व वेगळी मते मांडत आहे. अपत्यप्राप्ती हा प्रत्येकाच्या जीवनात अत्युच्च आनंदाचा प्रसंग आहे. त्यासाठी आपण अनेक तपासण्या करतो, देवादिके करतो, नवस-उपवास करतो. मात्र, आपल्या ओटीत अपत्य आले की, त्याच्या काळजीकडे दुर्लक्ष करुन कंस चालेल ? उन्हाळा हा तसाच बेसावध आणि दुर्लक्षाचा काळ. या काळात नवजात शिशू तथा पाचवर्षे वयोगटातील मुलांना व त्यांच्या मातांना घराच्या बाहेर जाण्याची परवानगीच देवू नये. माझे विचार आणखीनच टोकाचे आहेत. लग्नपत्रिका छपाई करताना त्यावर उल्लेख करावा की, शिशू आणि पाच वर्षाखालील बालके तथा त्यांच्या मातांना तीव्र उन्हात लग्न स्थळी आणू नये. ही बाब थोडी जास्त ताणलेली वाटेल. पण यामागील माझी भावना लक्षात घ्या. 

लग्ननपत्रिका आपण नातेवाईक, परिचित, मित्रमंडळींना देतो. त्यांच्याविषयी आपल्याला प्रेम असते. त्यांच्या मुलांविषयी सुद्धा आपल्याला प्रेम असते. तेव्हा त्या मुलांच्या भवितव्याप्रति आपण लग्नात नवजात शिशू किंवा पाचवर्षे वयोगटातील बालक तथा मातांना बोलावूच नये. लग्नपत्रिका देणाऱ्यानेच हे समजून घेतले तर न येणे, रुसणे वगैरे प्रकार होणार नाहीत. एवढेच नव्हे तर अशा काळात माहेर व सासरच्या मंडळींनीही शिशू, बालके तथा मातांना लग्नापासून लांबच ठेवावे.

हा विषय थोडा अर्थकारणाशीही संबंधित आहे. लहान बालकांचा कोणताही आजार केवळ नजरेने किंवा जुजबी तपासणी करुन ओळखता येत नाही. त्यासाठी रक्त व इतर तपासण्या कराव्या लागतात. कोणत्याही नव्या तंत्राचा खर्च जास्त आहे. शिवाय, बालकांचा आजार बळावलेला असेल तर हॉस्पिटलमध्ये दोन-तीन दिवस दाखल करावे लागते. हा खर्च वाढतो. मुलांच्या आजारामुळे सर्व कुटुंब परेशान होते. हे सारे घडू शकते असा अंदाज आम्ही वारंवार देत असतो, पण माता व पालक एेकत नाहीत. कोणत्याही लग्न कार्यात जाणे हा सुद्धा खर्च असतो. त्यामुळे बालकांच्या मातांनी थोडी समजदारी दाखविली तर बालकांची संभाव्य आजाराच्या त्रासातून सुटका होवू शकते.

बालकांना उष्माघाचा त्रास कसा होतो हे ओळखणे तसे सहज शक्य आहे. शरीराचे तापमान अचानक खुपच वाढते , बालकाची लघवी कमी होते. दिवसातून एक-दोन वेळा होते. ती नियमित चार ते पाचवेळा हवी. सुरूवातील रंग पिवळसर असतो. मात्र नंतरही तो गडद पिवळसर असेल तर लक्ष द्यायला हवे. मुले चिडचिड करू लागतात. नेहमी तहानलेले असतात. पाणी दिसले की त्याकडे झेपावतात. नंतर ते सुस्तावत जातात. पडून राहतात. त्याच्या त्वचेतील लवचिकता कमी होते. डोळ्यांसह टाळू सुद्धा खोल गेलेले दिसतात. अशा प्रकारची लक्षणे दिसत असली की, माता किंवा पालकांनी प्रथम बालकांच्या शरीरात पाणी टीकून राहील याची काळजी घ्यावी. त्याला चमच्याने हळूहळू पण सतत रस, ज्यूस असे द्रव पाजत राहावे. मीठ, साखर, पाणी याचा घोळ तयार करुन तो पाण्यातून पाजावा किंवा ओआरएसही उपलब्ध असते, ते पाजावे. शक्यतो पाणी घरगुती आणि उकळून थंड केलेलेच पाजावे. मुलांच्या अंगातील कपडे सैलसर व सुती असावेत. याउलट लग्नाला जातांना सगळ्याच माता सवता सह बालकांनासुधदा भरजरीचे कपडे घालुन निघतात....अंगात जाणवणाऱ्या तापापेक्षा कमी तापमानाच्या पाण्याने त्याचे अंग पुसावे. अंग पुसण्यासाठी अगदीच थंड पाणी मुळीच वापरू नये. शेवटचा अगदी महत्त्वाचा सल्ला म्हणजे, जवळपास उपलब्ध असलेल्या बालरोगतज्ञाकडेच बालकाला तातडीने न्यावे. कोणत्याही सर्वसाधारण उपचार, सलाईन, इंजेक्शनच्या भरवशावर थांबू नये.

वरील सर्व विचार हे कठोरपणाचे व टोकाचे वाटू शकतात. मात्र, यामागे माझ्या अनुभवाचे संचित आहे. रुग्ण म्हणून दाखल झालेल्या बालकांची आणि त्यांच्या पालकांची उन्हाळ्यातील कहाणी जवळपास सारखीच असते. उष्माघात हा आजार बळावला तर धोकादायक असतो. मात्र, उष्माघात होवू नये यासाठी काळजी घेणे हे तर प्रत्येकाच्या हातात आहे आणि ते सहज शक्य आहे. कोणत्याही बालकाचे पाचवर्षांपर्यंतचे आयुष्य हे फुलासारखे जपावे असेच असते. याच अपेक्षेने मी मुलांना आणि त्यांच्या मातांना कठोरपणे सूचना करीत असतो. 

आपल्याकडे काहीवेळा पंचागनुसार आणि ब्राह्मणांच्या सल्ल्यानुसार बुडी हा प्रकार आडवा येतो. त्याकाळात लग्ननसराई बंद असते. त्याच प्रकारे बालकांचे आयुष्य वाचविण्यासाठी एप्रिल-मे महिन्यात लग्न बंदच ठेवावेत.आज ब्लॉगच्या निमित्ताने हा विषय मी मुद्दाम जाहीरपणे चर्चेला ठेवला आहे. यावर लोकांनी सुस्पष्ट मत मांडणे आवश्यक आहे. त्याची प्रतिक्षा आहे.

पुढच्या वेळी बोलू नवा विषय घेवून ...

2 comments: