Wednesday, 24 August 2016

मराठा समाजाचा मूक एल्गार – मराठा क्रांती मोर्चा

कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील मराठा समाजातील अल्पवयीन मुलीवर दि. १३ जुलैला झालेल्या अत्याचार व त्यानंतर क्रूरपणे खुनाच्या घटनेनंतर महाराष्ट्रातील समाजमन गहिवरून निघाले आहे. विविध प्रकारच्या गट-तट, राजयकिय पक्ष, संघटना, ब्रिगेड आदींमध्ये विभागलेला मराठा समाज सर्व मान-अपमानाच्या भींती व मन-मतभेद झुगारुन एकत्र येत आहे. अत्याचारपिडीत मुलीला किमान मृत्यूनंतर न्याय मिळवून देण्यासाठी मराठा समाजाने मूकमोर्चा मार्गाने सुरू केलेला एल्गार आता समाजाचे एकत्रिकरणाचे माध्यम होवू पाहात आहे. याच माध्यमातून समाजासाठी आरक्षण व इतर राजकिय, सामाजिक प्रश्न सोडविण्याची संधीही उपलब्ध होवू शकेल.


औरंगाबादमधील मराठा क्रांती मूकमोर्चाने गर्दीचा उच्चांक मोडत राजकारणी व समाजकारणी मंडळींना इशारा दिला आहे. त्यापाठोपाठ राहुरी, उस्मानाबाद, बीड, पुणे येथे निघालेल्या मूक मोर्चाच्या एल्गारने मराठा समाजाचे संघटन अधिक मजबूतपणे करता येणे शक्य असल्याचे दाखवून दिले आहे.

कोपर्डीच्या घटनेनंतर जळगाव जिल्ह्यातील मराठा समाजही एकत्रिकरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. जळगाव येथेही दि. २९ ऑगस्टला औरंगाबाद पॅटर्ननुसार मराठा क्रांती मूकमोर्चाचा एल्गार केला जाणार आहे. यानिमित्त समाजातील वातावरण ढवळून निघाले असून समाजांतर्गत बैठका सुरू आहेत. जळगाव जिल्ह्यातील मराठा समाजांतर्गत असलेल्या विविध संघटना जसे मराठा सेवा संघ, मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड, शिवाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, छावा, शिव संग्राम आदी संघटना एकत्र आल्या आहेत. 

याबरोबरच सध्या जिल्ह्यातील विविध प्रमुख राजकिय पक्षांचे जिल्हाध्यक्षही मराठा समाजाचे असून त्यांनीही या मूकमोर्चा आंदोलनात सहभागाची भूमिका घेतली आहे. मात्र, या सर्वांचे एकत्र येणे संघटनात्मकदृष्ट्या कितपत लाभाचे व शक्तीप्रदर्शनाचे ठरले हे दि. २९ ला होणारी गर्दी पाहून समजू शकेल. औरंगाबादच्या पार्श्वभूमिवर आणि जळगाव जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये असलेली मराठा बहुल लोकसंख्या लक्षात घेता दि. २९ ऑगस्टचा मोर्चा किमान दोन लाखांच्यावर जाणे अपेक्षित आहे.

कधीकाळी महाराष्ट्रात मोगल व शिव छत्रपतींच्या काळात मराठे हे क्षत्रिय, युद्धकर्ते, जमीनदार म्हणून प्रसिद्ध होते. मराठा समाजाकडे इतर समाजांचे पालकत्व  होते. आताच्या राजकिय वातावरणात सत्तेत भागीदार असलेला मोठा समाज म्हणून मराठा समाजाकडे पाहिले जाते. पण पक्ष व संघटनात्मक भींती व विचारांच्या दुरावामुळे मराठा समाजाला हक्क, अधिकार मिळणे अवघड झालेले आहे. याचे कारण मराठे नेहमी युद्ध जिंकतात मात्र, तहात मात्र हरतात असा इतिहास आहे. आताही तसेच होत आहे. सत्ताप्राप्तीसाठी मराठ्यांचा वापर केला जातो पण सत्तेत किंवा रोजगारात संधी देताना मराठा नेत्यांना किंवा युवकांना डावलेले जाते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण येथील मुस्लीम सरदाराच्या सुनेला साडीचोळी देवून सन्मानाने रवाना केल्याचा उल्लेख इतिहासात आहे. परंतु आज मराठ्यांच्या लेकीबाळी सुरक्षित नसल्याचे चित्र आहे. ज्या मराठा नेत्यांकडून न्यायोचित अपेक्षा आहे, ती मंडळी सत्ताप्राप्ती किंवा अधिकारांच्या लालसेपोटी गप्प आहेत. अशावेळी समाजातील काही सुजाण व युवा मंडळींनी एकत्र येवून मराठा- क्रांती मोर्चाचा एल्गार सुरू केला  आहे. हा एल्गार मूकमोर्चा स्वरुपात असून त्यातून पुढाऱ्यांना शेवटची जागा देण्यात आली आहे. मूकमोर्चात सर्वप्रथम स्थान हे मुली-महिलांचे असणार आहे. त्यानंतर युवक आहेत. त्यानंतर प्रतिष्ठीत मंडळी आणि शेवटी नेते अथवा पुढारी असणार आहेत.

इतिहासाच्या पानांत मराठा म्हणून मल्ल + रट्टा अथवा महा + रट्टा म्हणून शब्दांची फोड आहे. सत्ता व संपत्तीने हा महारट्टा वैभव संपन्न समाज होता. आज तो इतरांकडे आरक्षण मागतो आहे. जी संपन्नता पूर्वी मराठ्यांकडे होती ती आज नाही. महाराष्ट्रात समाजाची लोकसंख्या ३२ टक्के आहे. परंतु उच्च शिक्षण, रोजगार, स्वयंरोजगार, राजकारण आदी कारणांमुळे हा समाज आर्थिक अस्थैर्य आणि गटा-तटात दुभंगला आहे. मराठा समाजाची अवस्था आज डायनॉसोर सारखी आहे. तो आकारमानाने अवाढव्य आहे. पण काळानुसार तो बदलायला तयार नाही. भविष्यात हा समाज नामशेष होण्याची भीती आहे. त्याला कारण लेकीबाळींचे कमी होणारे प्रमाण आणि सुधारणावादी विचारांच्या सुशिक्षीत मुलींचे इतर जातीत होणारे विवाह ही सुद्धा समस्या आहे. समाजातील व्यसनाधिनता आणि उच्च, निच कुळाचा अभिमान हे सुद्धा समाजाला रसातळाला नेत आहेत. तसे व्हायचे नसेल तर आज समाजाला एकत्र येवून आपल्यात बदल घडवून आणावे लागतील.

मराठा समाज पूर्वी होता तेथेच आज आहे. हे विविध प्रकारच्या सामाजिक सर्वेक्षणातून समोर आले आहे. समाजातील विविध प्रश्नांमुळे घडणाऱ्या शोकांतिका कोणालाही दिसत नाहीत. त्यासाठी कोणताही पुढारी उत्तर देत नाही. मात्र, मराठा म्हणून गोळा  होणाऱ्या गर्दीत सर्वचजण सहभागी होतात. अशा संधीसाधू प्रवृत्तीला मराठा क्रांती मोर्चा हा शहाणपणाने उत्तर देत आहे. हा मोर्चा आक्राळास्तपणा करण्यासाठी नाही. तो मूक आहे पण त्यात असंतोषाची धग आहे. ही धग लाखोंच्या संख्येत गोळा झाल्यानंतर दिसून येईल. म्हणूनच जळगाव येथे दि. २९ ऑगस्टला निघणाऱ्या मोर्चात जळगाव जिल्ह्यातील मराठा समाजाच्या प्रत्येक घरातील आबालवृद्धांनी, लेकीबाळींनी, मुले युवकांनी सहभागी व्हावे असे आवाहन मोर्चाचे सर्व संयोजक करीत आहोत. आता प्रतिक्षा आहे केवळ दि. २९ ऑगस्टची आणि मूक एल्गारची ...

तुमचे-माझ नाते काय ... जय जिजाऊ, जय शिवराय


मराठा क्रांती मोर्चा नियोजन

दि. २९ ऑगस्टला दुपारी १२.३० वाजता सर्व कुटूंब, नातेवाईकासह नुतन मराठा महाविद्यालय येथे एकत्र या. याची माहिती इतर बांधवांना द्या. समाजावरील अन्यायाविरुध्द हा लढा आहे. आपणास शक्य असेल तर काळे कपडे घालावेत, येताना सोबत आई-वडील, बायको मुलांसह यावे, शक्य होईल तेवढ्या मराठा समाज बांधवांना सोबत घेऊन यावे, लाखोंच्या संख्येने दाखवलेली ही ताकद आपल्या भविष्यातील पिढीला बळ देणारी ठरेल, मला काय करायचे... जाणारे जातील... मी एकटा गेलो नाही म्हणून काय होणार आहे... अशी मानसिकता ठेवून घरात बसू नका..., या मोर्चास कोणाचेही नेतृत्व नाही... तुम्ही तुमचे नेतृत्व करणार आहात, हा एक मोर्चा ... मराठा स्वाभिमानास जागवणारा आहे... चेतवणारा आहे..., नोकरीत असला तर रजा टाका..., व्यावसायिक असाल बंद ठेवा...,  द्या ताकद.... द्या बळ... षंढ होऊन थंड राहाण्यापेक्षा गुंड होऊन एक दिवस  समाजासाठी  रस्त्यावर या... आपल्या लेकीबाळीसाठी... आपल्या आई, बहिणीसाठी या... आपल्या सुरक्षिततेसाठी या...

2 comments:

  1. Very good initiative. Good work. We all are with you. Jai shivaji.
    Everyone plz come together n show the power of unity.

    ReplyDelete
  2. Very good initiative. Good work. We all are with you. Jai shivaji.
    Everyone plz come together n show the power of unity.

    ReplyDelete