Monday, 16 January 2017

स्वतःसोबत दुसऱ्यांसाठी जगा ...

'रोटरी ' म्हणजे, जगाला सामाजिक सेवेचा वसा देणारी आंतरराष्ट्रीय संस्था. माझ्यासह लाखो लोकांना या संघटनचा सदस्य, पदाधिकारी असल्याबद्दल नक्कीच अभिमान आहे. गेल्या काही वर्षांत रोटरी संघटन समाजातील अगदी छोट्यातील छोट्या घटकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कार्य करीत आहे. रोटरीअंतर्गत सतत होणाऱ्या चर्चा, बैठका, सभांमधून सामाजिक कार्याची दिशा बदलते आहे. रोटरी आता गाव, पाड्यांवर पोहचली आहे. त्यामुळे समाजातील अशा घटकांसाठी कार्य करण्याची जबाबदारी रोटरीवर वाढते आहे.  


रोटरी संघटन शिस्तबद्ध पद्धतीने काम करते. आपण सध्या काय करतो आहोत, त्याचे परिणाम काय आहेत, त्यात काय सुधारणा हवी आणि भविष्यात काय करावे ? अशा मूलभूत प्रश्नांची उत्तरे सतत शोधण्यासाठी रोटरीचे अंतर्गत सेमिनार, परिसंवाद, चर्चासत्रे होतात. त्यात वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी मान्यवर म्हणून सहभागी होतात आणि सामाजिक कार्यासाठी दिशादर्शन करतात. अलिकडे दि. ७ व ८ जानेवारीस नागपूर येथे रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० ची "स्वप्नपूर्ती" कॉन्फरन्स झाली. नाशिकपासून तर नागपूरपर्यंतच्या प्रांतातील सर्व रोटरी क्लबचे जवळपास १८०० चे वर सदस्य यात सहभागी झाले. या कॉन्फरन्सची मेनथीम स्वप्नपूर्ती होती. रोटरीचे नवे पदाधिकारी जेव्हा पदग्रहण करतात तेव्हा ते काही विशिष्ट कार्यांचे संकल्प करतात. हे संकल्प कसे पूर्ण होतील याचा आढावा घेण्यासाठी या कॉन्फरन्सला स्पप्नपूर्ती म्हटले होते. दोन दिवसांच्या या कॉन्फरन्सचे नियोजन रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे प्रांतपाल महेश मोकाळकरचेअरमन असिफ जाहीद, माजी प्रांतपाल किशोरजी केडीया यांनी उत्तमपणे केले होते. या कॉन्फरन्ससाठी अमेरिकेतून विशेष अतिथी ब्रेन हॉल हेही उपस्थित होते. त्यांनी रोटरीच्या १०० वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला. त्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

या कॉन्फरन्सचे वैशिष्ट असे की, समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर जेव्हा त्यांचे अनुभव कथन करतात तेव्हा भविष्यात रोटरीने कोणत्या विषयांना हात घातली पाहिजे याची एक दिशा निश्चित होत जाते. सामाजिक विषयांची समज आणि आकलन अशा व्यक्तिंच्या व्याख्यानातून होते. त्यामुळे कॉन्फरन्समधील प्रत्यक सेशन हे लक्षपूर्वक ऐकण्याचे असते. सर्व्हिस टू कम्युनिटी या विषयावर सामाजिक कार्यकर्ते आचार्य वेगेशी, सर्व्हिस टू नेशन या विषयावर डॉ. बी. डी कुळकर्णी, पॉवर ऑफ पर्पज या विषयावर डॉ. उषा मोहन दास, सिव्हील सोसायटी ऍण्ज कॉन्स्टीट्यूश्नल व्हॅल्यू या विषयावर माजी न्या. सुजाता मनोहर, व्हर्च्यूअल आय विषयावर अनिंद्य दासगुप्ता, अर्थक्रांती विश्वशांती या विषयावर अनिल बोकील, जॉय ऑफ गिव्हींग या विषयावर हणमंतराव गायकवाड, सर्व्हिस अबोव्ह सेल्फ या विषयावर शंकरबाबा पापलकर, रोल ऑफ रोट्रीयन मेकींग युवर सिटी व सेफर या विषयावर डॉ. के व्यंकटेशन, भारत एक आर्थिक महासत्ता या विषयावर नरेंद्र जाधव, माय स्टोरी विषयावर अरुनिमा सिन्हा आदी मान्यवरांची व्याख्याने झाली. यातील प्रत्येक व्याख्यान हे अंतर्मुख करणारे व समाजातील विविध विषयांचे पैलू उलगडणारे होते.

मला व्यक्तिशः यातील हणमंतराव गायकवाड आणि शंकरबाबा पापळकर यांची व्याख्याने भारावून गेली. यातील हणमंतराव हे सातारा जिल्ह्यातील आहेत. हाऊस किपिंग क्षेत्रातील अग्रेसर असलेल्या बीव्हीजी गृपच ते संचालक आहेत. त्यांनी त्यांची यशोगाथा सांगितली. ती भारावणारी होती. सातारा जिल्ह्यातले रहिमतपूर हे त्यांचे गाव. त्यांच्या आयुष्यवर शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा प्रभाव आहे. एका कंपनीत काम करताना सफाईचे काम सुरू केले आणि त्यातून प्रेररणा मिळत पुढे संसदेच्या हाऊसकीपिंगचे काम मिळाले. त्यानंतर बीव्हीजीचे नाव पसरतच गेले. पुढच्याच वर्षी लोकसभा, राज्यसभेच्या स्वच्छतेची कामे मिळाली. पुढे पंतप्रधानांच्या निवासाचे काम मिळाले. तिथे बागेतला धूळ बसून काळा झालेला रस्ता पहिल्यासारखा स्वच्छ लालभडक केला आणि त्याने किमया केली.

हणमंतराव गायकवाड
मग पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भवन, सर्वोच्च न्यायालय अशी कामे मिळत गेली. आज बीव्हीजीच्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या आहे ६० हजार. अगदी तिसरी उत्तीर्णपासून ते उच्चशिक्षित अधिकाऱ्यांपर्यंत अनेक जण तेथे काम करतात. बीव्ही गृपचा विस्तार वेगाने वाढतोय. भारतीय रेल्वे, टाटा समूह, फोक्सवॅगन, हिंदुस्थान लिव्हर,  ओएनजीसी, आयटीसीअशा कंपन्या जोडल्या गेल्या आहेत. देशभर २० राज्यांमध्ये चारशेपेक्षा जास्त कंपन्या, संस्था या गृपकडून सेवा घेतात. महाराष्ट्रात नुकतीच यशस्वी पणे सुरु असलेली १०८ रुगणवाहिका सेवा ही देखील बीव्हीजीचीच देणं आहे. हणमंतरावांची कहाणी अंतर्मुख करणारी आहे.

त्यानंतर शंकरबाबा यांनी वेगळ्याच विषयाकडे लक्ष वेधले. जन्माला येणारे मूल गतिमंद असेल किंवा त्याला जन्मतः व्यंग असेल तर पालक अशा मुलांना सोडून देतात. अशी मुले रस्त्यांवर अनाथ म्हणून पडून असतात. अशा मुलांना गोळा करुन त्यांना पितृत्व देण्याचे कार्य शंकरबाबा करीत आहेत. पितृत्व हा शब्द अक्षरशः सत्य आहे. अशा गतिमंद तथा व्यंग असेल्या अनाथ मुलांचे आधार कार्ड शंकरबाबा पापळकरांनी तयार केले असून त्यावर पिता म्हणून त्यांचेच नाव आहे.

अमरावती जिल्ह्यात वझ्झर गावातील एका टेकडीवर शंकरबाबांनी अनाथ, अपंग मुलांचे नंदनवन फुलवले आहे. शासनाची मदत न घेता समाजातील दात्यांनी दिलेली मदत घेऊन हा बाप दीडशे मुलामुलींचे कुटुंब आनंदाने चालवतो आहे. या चिमुकल्यांचा शेंबूड काढण्यापासून त्यांची पूर्ण शुश्रूषा बाबा स्वत:च्या हाताने करतात. लग्नाला आलेल्या मुलींसाठी स्थळ शोधताना चप्पल झिजवतो. त्या मुलींच्या कन्यादानासाठी दानशूरांना शोधतो. अधिकारी, प्रतिष्ठित, सामाजिक कार्यकर्ते यांना त्या मुलींचे नातेवाईक बनवून त्या मुलींचा संसार उभारतो. बाबाने कोणताही पुरस्कार आजपर्यंत स्वीकारलेला नाही. एखाद्याने परस्पर जाहीर केलेली देणगी स्वीकारलेली नाही. अशा मुलामुलींचे जीवन घडवणे एवढेच त्याचे ध्येय नाही, तर देशभरातील अशा मुलांच्या संगोपनासाठी कायदा व्हावा म्हणून बाबा दिल्लीपर्यंत लढा देत आहेत.

जळगावच्या रोटरीने 'रोटोस्पोर्टस' च उत्तम पद्धतीने आयोजन केल्याबद्दल बाबांच्या हस्ते आमचा सत्कार करण्यात आला. त्याचवेळी बाबांनी एक जबाबदारी जळगावच्या रोट्रीयन्सवर टाकली. बाबांकडे जामनेर तालुक्यातील एक कन्या आहे. तिचे लग्न धूमधडाक्यात करा असी प्रेमाची सूचना केली. त्यामुळे टीम जळगावची जबाबदारी वाढली आहे. अशा प्रकारे रोटरी कॉन्फरन्स ही आम्हाला वेगळी दिशा देणारी ठरली आहे. जळगावहून रोटरीचे सहा क्लब मिळुन जवळपास १०० सदस्य या कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते...खरोखरच यावर्षीची "स्वप्नपूर्ती" कॉन्फरन्स अविस्मरणीय व प्रेरणांदायी ठरावी अशीच होती !!                       


2 comments: